नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे पार

डेंग्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसून, ऑक्टोबरच्या गेल्या २४ दिवसांतच डेंग्यूचे नवीन १२१ रुग्ण आढळल्याने डेंग्यूबाधितांचा एकूण आकडा आता ६४३ वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या कानउघाडणीनंतर मलेरिया विभागाने डेंग्यू निर्मूलन मोहीम युद्धपातळीवर राबविण्यास सुरुवात केली असून, गेल्या महिनाभरात शहरातील तब्बल एक लाख घरांना भेटी देत १.३० हजार पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात ८२७ पाणीसाठ्यांत डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी असूनही नाशिक शहर डेंग्यूच्या विळख्यात गेले आहे. जुलै अखेरपर्यंत शहरात अवघे १४४ डेंग्यू रुग्ण होते. ऑगस्टपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत गेला. या महिन्यात डेंग्यूचे ११७ रुग्ण आढळले. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूची विक्रमी लागण होऊन २६१ जण पॉझिटिव्ह आढळले. डेंग्यूबाधितांचा हा आकडा महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील नोंदीनुसार घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या डेंग्यूबाधितांची संख्या अधिक असल्यामुळे डेंग्यूबाधितांचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता आहे.

८२७ ठिकाणी डेंग्यू डासांची उत्पत्ती

डेंग्यू निर्मूलनांतर्गत मलेरिया विभागाच्या पथकांनी गेल्या महिनाभरात शहरातील १ लाख ४,७१९ घरांना भेटी दिल्या असून, १ लाख ३० हजार ५२ पाणीसाठ्याची तपासणी केली आहे. यात ८२७ पाणीसाठ्यांमध्ये डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले आहे. त्यातील ५५३ पाणीसाठे रिते करण्यात आले असून, २७४ पाणीसाठ्यांमध्ये ॲबेट प्रक्रिया करून डासांच्या अळ्या नष्ट करण्यात आल्या आहेत. ३३८ पाणीसाठ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत.

१०१२ नागरिकांना नोटिसा

डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीची ठिकाणी आढळलेल्या १०१२ मिळकतधारक, संस्था, खासगी तसेच शासकीय कार्यालयांना महापालिकेच्या मलेरिया विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. डास निर्मूलनासाठी महापालिकेच्या मलेरिया तसेच पेस्ट कंट्रोलच्या कर्मचाऱ्यांमार्फत गेल्या महिनाभरात तब्बल २२ हजार ७७० घरांमध्ये धूरफवारणी करण्यात आली आहे.

चिकुनगुनियाचाही शिरकाव

डेंग्यूपाठोपाठ नाशकात चिकुनगुनियाचाही शिरकाव झाला आहे. गेल्या महिनभरात चिकुनगुनियाचा एक नवा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे चिकुनगुनियाबाधितांचा आकडा आता चार झाला आहे. गेल्या महिनभरात मलेरियासदृश आढळलेल्या ६३८२ रुग्णांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र एकही मलेरियाबाधित रुग्ण आढळला नसल्याचे मलेरिया विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले. 

हेही वाचा :

The post नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे पार appeared first on पुढारी.