नाशिकमधील डेंग्यू रुग्णसंख्या ९० वर

डेंग्यू डास, Dengue

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येथे स्वाइन फ्लू पाठोपाठ आता डेंग्यूनेही डोके वर काढले आहे. गेल्या तीन आठवड्यांत शहरात या आजाराचे १९ नवे रुग्ण आढळल्याने डेंग्यू बाधितांचा आकडा आता ९० वर पोहोचला आहे. उन्हाची काहिली शमविण्यासाठी घरोघरी आणलेले कूलर्स तसेच पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये वाढलेली पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरत आहे.

येथे गेल्या वर्षी तब्बल ११९१ डेंग्यूबाधित आढळले होते. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव भीतिदायक ठरला होता. डिसेंबर २०२३मध्ये या आजाराने तीन जणांचा बळी घेतला होता. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाने तातडीने उपाययोजना करत धूरफवारणी, जंतूनाशक फवारणी सुरू केल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. ‘एडीस एजिप्ती’ या जातीचा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. या प्रजातीच्या डासांची उत्पत्ती ही पाच ते सात दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. वाढत्या उन्हामुळे यंदा कूलर, एसीचा वापर वाढला आहे. कूलरमध्ये पाणी साचून राहात असल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका कायम असूनही शहरात डेंग्यूरुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय विभागाच्या पथकांनी दिलेल्या घरभेटीत ही बाब समोर आली आहे. जानेवारी ते २१ मे या दरम्यान आतापर्यंत डेंग्यूचे ९० रुग्ण आढळले आहेत. मे महिन्याच्या गेल्या २४ दिवसांतच तब्बल १९ नवे रुग्ण आढळले असून, अजूनही काही रुग्णांचे तपासणी अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित असल्याने रुग्णसंख्येचा हा आकडा शंभरपार होण्याची शक्यता आहे. दरम्यान शहरात चिकूनगुणियाचीही एंट्री झाली असून, महिनाभरात चिकूनगुणियासदृश आजाराचे १३ आढळले आहेत.

डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात वाढत आहे. कूलर्स, पाण्याच्या टाक्या, फुलदाण्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होत आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

– डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

हेही वाचा –