नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हे राज्यात महायुतीचे आणि राष्ट्रस्तरावर एनडीएचे घटक आहोत. निवडणुकीसाठी आता राहिलेल्या तीन दिवसांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार कसा करावा यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात बैठक झाली आहे. नाशिकच्या उमेदवाराबाबत घोषणा करायला उशीर झाला. आम्ही इथून उमेदवारी मिळवायला अपयशी ठरलो. मात्र, आता आम्ही भाजप व सेनेच्या पाठीशी राहणार आहोत. आतापर्यंत विरोधात निवडणूक लढलो आहोत. मात्र, आता महायुतीत असल्याने अखेरच्या टप्यात सगळ्यांनी सक्रिय होत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले आहे.
तटकरे नाशिकमध्ये दाखल
- नाशिक लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे.
- नाशिकच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
- या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकमध्ये दाखल झाले.
- त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला.
तटकरे म्हणाले, नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यावरुन महायुतीत अनेक दिवसांपासून तिढा होता. या ठिकाणी जागा मिळविण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह भारतीय जनता पार्टी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र, अखेरीस महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती याकडे लक्ष वेधत आपण अपयशी ठरलो असल्याची खंत देखील यावेळी व्यक्त केली.
पदाधिकाऱ्यांना केल्या सूचना
नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. आता आम्ही महायुतीत असून प्रचार सुरू केलाय. अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याने ते काल सुद्धा मुंबईत हजर नव्हते. त्यामुळे आज मी नाशिकला आलोय.
माणिकरावांची समजूत काढण्यात आली आहे
हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे नाराज होते. अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली. याबाबत सुनील तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, माणिकराव कोकाटे स्पष्ट वक्ते आहेत. त्यांची समजुत काढण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दिंडोरी मतदारसंघातील चारही आमदार सक्रिय झाले आहेत. त्यांच्या मनातल्या भावना मी समजून घेतल्या असून आता भारती पवारांबाबतची नाराजी दूर झालीय. विरोधकांना पराजायचे चित्र दिसत असल्याने स्थानिक पातळीवरची टीका केलीय जातेय. आम्ही आजही महायुतीत आहोत व पुढेही राहू, असे त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा-