नाशिकमध्ये आयपीएलवर सट्टा लावणारा गजाआड, संशयिताचे १० ते १२ आयडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आयपीएल सामन्यांवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. निशिकांत पगार (३७, रा. इंदिरानगर) असे या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून टॅब, दोन मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला.

आयपीएल सामन्यांची रंगत रंगली असून, क्रिकेटप्रेमींकडून सामन्यांचा आनंद लुटला जात आहे, तर दुसरीकडे काही सट्टेबाज या सामन्यांच्या आडून जुगार खेळत असल्याचे समोर येत आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित पगार हा नांदूर नाका परिसरात चेन्नई सुपर किंग व गुजरात टायटन यांच्यातील सामन्यावर बेटिंग लावत असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक बागूल, हवालदार विशाल काठे, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, चालक नाझीमखान पठाण आदींच्या पथकाने नांदूर नाका येथील हॉटेलच्या पाठीमागील परिसरात छापा टाकून संशयित पगार याला पकडले. तो बेटिंग करताना आढळला. पगारविरोधात आडगाव पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० ते १२ आयडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पगारविरोधात याआधीही जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. त्याने १० ते १२ आयडी तयार करून त्यामार्फत बेटिंग करत असल्याचे उघड झाले. त्यामुळे इतर आयडीधारकांचाही शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये आयपीएलवर सट्टा लावणारा गजाआड, संशयिताचे १० ते १२ आयडी appeared first on पुढारी.