नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क वृत्तसेवा –
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवार (दि.२९) महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र असलेले एक पोस्टर फाडले गेले.

डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र असलेले पोस्टर फाडल्याचा प्रकार हा अनावधानाने झाल्याचे सांगत आव्हाड यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे. मात्र त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी शहरात जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत हा मुद्दा केंद्रीत केला आहे.  भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटही आव्हाडांविरोधात असून गुरूवार (दि.३०) सकाळपासूनच राज्यभरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत. परिणामी शहरातील वातावरण खूपच तापलेले दिसून येत आहे.  आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून जितेंद्र आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचाही प्रयत्न यावेळी करण्यात आला आहे.