नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन

उंटाची तस्करी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये दाखल उंटांचे राजस्थानमधील महावीर कॅमल सेन्चुरीमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने १५१ उंटांचा हा कळप राजस्थानकडे रवाना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. तत्पूर्वी, पशुसंवर्धन विभागाकडून उंटांचे लसीकरण व टॅगिंग केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. दरम्यान, पांजरापोळमध्ये दाखल उंटांपैकी आणखी एका उंटाचा गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला.

गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये दाखल झालेले उंट हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. राजस्थानहून गुजरातमार्गे शहरात तब्बल १११ उंट स्थिरावले आहेत. तर मालेगावला ४४ उंट दाखल झाले आहेत. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच उंट दाखल झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या सर्व उंटांची मालकी कोणाची? एवढ्या मोठ्या संख्येने ते कोठे नेण्यात येत होते? याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. नाशिकमध्ये दाखल १११ उंटांची रवानगी चुंचाळे येथील पांजरापोळ येथे करण्यात आली आहे. त्यापैकी चार उंट दुर्दैवाने दगावले आहेत. तसेच मालेगावच्या गोशाळेत ४३ उंट आश्रयास आहेत.

उंटांच्या मालकीचा गुंता कायम असल्याने त्या सर्वांना पुन्हा राजस्थानला पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तेथे महावीर कॅमल सेन्चुरी संस्थेत उंटांचे पुनर्वसन केले जाणार आहे. राजस्थानपर्यंत या उंटांना सुरक्षित नेण्यासाठी धरमपूर येथील श्रीमद‌् राजचंद्र मिशन संस्थेने पुढाकार घेतला आहे. महावीर कॅमल सेन्चुरी संस्था रायका (उंटांचा सांभाळ करणारे) पुरविणार आहे. दोन दिवसांत हे ‘रायका’ नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाकडून ‘रायकां’च्या मदतीने उंटांचे लसीकरण व टॅगिंग केले जाईल. तसेच नाशिकपासून ते राज्याच्या सीमेपर्यंत पोलिस बंदोबस्तात हे उंट रवाना केले जातील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

उंटांचा पायी प्रवास

उंटांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना दररोज सुमारे ४० किलोमीटर अंतर पायी चालविणे गरजेचे आहे. वाळवंटात न थांबता दररोज हे उंट पायी फिरत असल्याचे पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जातेय. त्यामुळे रायकांच्या सहाय्याने उंटांचा राजस्थानपर्यंतचा प्रवास पायी नेणे हाच पर्याय असल्याचे राजचंद्र मिशनकडून सांगण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

रायका समुदायाकडून पालन

रायका हा एक भटका-विमुक्त समुदाय आहे. राजस्थानला पिढ्यानपिढ्यांपासून हा समुदाय उंट व अन्य जनावरांचे पालन करत उदरनिर्वाह करतो.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये दाखल उटांचे राजस्थानस्थित संस्थेत होणार पुनर्वसन appeared first on पुढारी.