त्र्यंबकेश्वर (नाशिक): पुढारी वृत्तसेवा – येथील बिल्वतीर्थ तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.8) दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली आहे. तनुजा युवराज कोरडे (13) आणि अर्चना बाळू धनगर (12) अशी या मुलींची नावे आहेत.
तनुजा आणि अर्चना (रा. दोघी चौकी माता, त्र्यंबकेश्वर) या दोघी दुपारच्या सुमारास नीलपर्वत टेकडीच्या पाठीमागे असलेल्या बिल्वतीर्थ तलावावर आल्या होत्या. कपडे धुताना एकीचा तोल गेल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुसरीने पाण्यात उडी मारली. परंतु दोन्ही खोल पाण्यात बुडाल्या. दरम्यान, जवळच असलेल्या महिला आणि तरुणांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धाव घेत मुलींना तातडीने बाहेर काढले. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने दोन्ही जागीच गतप्राण झाल्या होत्या. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्र्यंबकनगरीत घडलेल्या प्रकाराने हळहळ व्यक्त होत आहे.
तीन दिवसाआड पाण्यामुळे अडचण
त्र्यंबक शहरात नगर परिषदेकडून तीन दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तो देखील अनियमित व अपुरा आहे. नागरिक पिण्यासाठी जार विकत घेतात. मात्र, वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने मिळेल तेथून पाणी आणणे तसेच धुणे धुण्यासाठी महिलांना बिल्वतीर्थ तलावावर जावे लागते.
यापूर्वी तलावात बाप-लेकाचा मृत्यू
बिल्वतीर्थ तलाव देवस्थान ट्रस्टच्या मालकीचा आहे. काही वर्षांपूर्वी या तलावातील गाळ काढण्यात आल्याने काही ठिकाणी तो जास्त खोल झाला आहे. तलावाला सुरक्षा कठडे नाहीत. यापूर्वी वाहन पडून दुर्घटना झाली आहे. त्यामध्ये बाप-लेकाचा जीव गेला होता. देवस्थान ट्रस्टने संरक्षक भिंत बांधण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा: