नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक शहरात आयकर विभागाच्या पथकांनी छापे मारून नामांकित सराफासह एका बांधकाम व्यावसायिकाची चौकशी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले. गुरुवार (दि. २३)पासून ही कारवाई सुरू असून, शुक्रवारीदेखील कारवाई झाली. यात आयकर विभागाने महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. दोघांच्या कार्यालयासह निवासस्थानी विभागाने छापे टाकले आहेत. दोघांनी आर्थिक व्यवहारांची माहिती दडविल्याचा संशय आयकर विभागास आहे.
नाशिकमध्ये काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, सराफ व्यावसायिकांच्या कार्यालयासह निवासस्थानी छापे टाकले होते. त्यावेळीही आयकर विभागाने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहारांची तपासणी करीत काही कागदपत्रे जप्त केली होती. त्यानंतर पुन्हा शहरातील कॅनडा कॉर्नर येथील नामांकित ज्वेलर्सच्या दालनात आयकर विभागाने गुरुवारपासून छापा टाकल्याचे समोर येत आहे. एकाच ज्वेलर्सच्या दोन दालनांमध्ये तपासणी सुरू करीत दालने बंद केली. सोने-चांदी खरेदीसह दागिन्यांचे व्यवहार दडवणे आणि हवाला रॅकेटचा संशय पथकास असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही संशयितांच्या दुकानांसह कार्यालये व घरांमध्येही आयकर विभागाने झडती घेतली. सकाळपासून तळ ठोकलेल्या पथकाने सायंकाळी उशिरापर्यंत व्यवहारांची पडताळणी केली.
मनमाड येथेही तपासणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळपासून छापा टाकून तपासणी सुरू केली. दोन स्वतंत्र पथके तपासणी करत आहेत. मनमाड येथे तपासणी करून पथक शहरात दाखल झाल्याचे समजते. तसेच कॅनडा कॉर्नर परिसरातील दालनास वाहनांचा वेढा होता.
हेही वाचा –