नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क– दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारपासून (दि. २९) लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी पुन्हा एकदा नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही मात्र अनेकांनी अर्ज घेतले आहेत. असे असताना नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आज शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाकडून आपला उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अद्याप महायुतीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसताना शांतीगिरी महाराज यांनी मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज भरल्याने ते महायुतीचे उमेदवार असणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
महायुतीकडून या जागेसाठी हेमंत गोडसे हे इच्छुक आहे. तर, छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी पक्षाचा दावा कायम असल्याचे म्हटले आहे. मात्र असे असताना शांतीगिरी महाराज यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे कळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, शांतीगिरी महाराज यांनी अर्ज भरला असला तरी त्यांना एबी फार्म दिलेला नाही. त्यामुळे आजूनही संभ्रम कायम आहे. मात्र, तसे झाल्यास भुजबळ व गोडसे दोघांनाही हा मोठा धक्का असणार आहे.