इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा– पाथर्डी परिसरातील वाडीचे रान येथे सर्व्हे नंबर १९२ मध्ये रेवगडे बंगल्याजवळ एक-दोन दिवसांपासून चार बिबट्यांचा वावर दिसून येत असल्याचा दावा स्थानिक करत आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली आहे.
पाथर्डी फाटा परिसरात बिबट्याने स्थानिक शेतकरी श्रीधर नवले यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून त्याला मारले. या भागात नवलेमळा, दातीरमळा, जाचकवस्ती व दशरथ दातीर यांच्या घरासमोर हे चार बिबटे दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत एखाद दुसरा बिबट्या नजरेस पडणे हे या भागासाठी नवीन नव्हते. मात्र, एकाच वेळी चार बिबटे फिरत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केल्याने वनविभागदेखील अलर्ट मोडवर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी जितू नवले, बाळा दातीर, पांडुरंग जाचक, समाधान जाचक, संतोष जाचक, कोंडाजी जाचक, रेवगडे, महिंद्र नवले यांनी केली आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि.२३) सायखेडा येथील बोडके वस्तीत एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
वनविभागाने पिंजरे लावून या बिबट्यांना जेरबंद केले पाहिजे. शेत शिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यावर या बिबट्याने हल्ला केल्यास अवघड प्रसंग उभा राहू शकतो. पांडवलेणी येथे सकाळच्या प्रहरी अनेक नागरिक फिरण्यासाठी येतात. त्यांच्यावरदेखील हे बिबटे हल्ला करू शकतात. – एकनाथ नवले
हेही वाचा –