नाशिक : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी तालुक्यातील किराणा व्यावसायिकाचे अपहरण करीत त्याला मारहाण करीत लूटमार केल्याची घटना दिंडोरी रोडवर घडली होती. याप्रकरणी व्यावसायिक अमित रवींद्र कुलकर्णी (३६, रा. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार, म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. अपहरणकर्त्यांनी व्यावसायिकाकडील एक लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली आहे.
बुधवारी (दि. ५) सायंकाळी 7.30 ते 8 च्या सुमारास दिंडोरी रोडवरील केंब्रिज शाळेजवळ हा प्रकार घडला होता. अमित कुलकर्णी हे किराणा माल खरेदीसाठी वणी येथून नाशिकला येत होते. त्यावेळी ते लघुशंकेसाठी थांबले असताना चार संशयित तेथे आले. त्यांनी चेहऱ्याला रुमाल बांधलेले होते. संशयितांनी अमित यांच्या डोक्यात काहीतरी मारून त्यांना बेशुद्ध करीत कारमध्ये डांबले. कारच्या डिकीत टाकून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करीत दुखापत केली. तसेच अमित यांच्याकडील चार हजार रुपयांची रोकड, गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याचे मनगटी कडे बळजबरीने काढले. त्यानंतर अमित यांना आडगाव येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेजजवळ नेऊन सोडले. दुचाकीची चावी त्यांना देत दुचाकी मागे लावल्याचे सांगत अपहरणकर्ते फरार झाल्याचे अमित यांनी सांगितले. म्हसरूळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषणाद्वारे अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला आहे.
तीन दिवसांनी गुन्हा दाखल
अपहरण व लूटमारीची घटना बुधवारी (दि. ५) घडली होती. मात्र या प्रकरणी शनिवारी (दि. ८) गुन्हा दाखल करण्यात आला. दडपण, भीतीच्या सावटाखाली असल्याने त्यांनी उशिरा फिर्याद दिल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, कारची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणानुसार तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिली आहे.
हेही वाचा: