नाशिकमध्ये शेअर आयपीओत डॉक्टरला दीड कोटींचा गंडा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा – आमच्या कंपनीचे स्टॉक आयपीओ घेतले तर नफ्यातच रहाल तसेच एका शेअरवर एक शेअर मोफत मिळेल अशा प्रकारचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी डॉक्टरला दीड कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याबाबत सायबर पाेलीस ठाण्यात अनाेळखी व्हाटस् ॲपधारक व इन्स्टाग्राम प्राेफाईलधारकांवर फसवणुकीसह आयटी ॲक्टन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील डाॅक्टरसह दाेघांना वेगवेगळ्या व्हाटस् ॲप क्रमांक आणि इन्स्टाग्राम प्राेफाईलवरुन चोरट्यांनी संपर्क साधला होता. शेअर मार्केटमधील अधिकृत कंपनीचे ब्राेकर आहाेत. गुंतवणूक करायचीच आहे आणि आर्थिक फायदाच हवा असेल तर आमच्याकडे ट्रेडिंग, स्टाॅक टू आयपीओ घ्या, असे अमिष दाखविले. शेअर मार्केटमधील स्टाॅक आणि आयपीओ स्वतंत्ररित्या घेतल्यास आर्थिक फायदा हाेईल, असे सांगून आमच्या कंपनीचे ट्रेड, स्टाॅक आम्हीच विकू शकताे. त्यामुळे गुंतवणूकदारास कुठलाही ताेटा हाेत नाही, उलट फायदाच हाेताे, असे अमिष दाखविले. संशयितांनी सांगितल्याप्रमाणे डाॅक्टरने तब्बल १ काेटी ४३ लाख रुपये गुंतविले, तसेच इतर दाेघांनीही एकूण १३ लाख रुपये गुंतविले. संशयितांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर पैसे भरले असता संशयितांनी काही प्रमाणात नफा बँक खात्यात क्रेडिट झाल्याचे भासविले. प्रत्यक्षात हे पैसे डाॅक्टरसह इतरांच्या बँक खात्यात आलेच नसल्याने ते काढताना किंवा जमा रक्कम तपासताना फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणात तिघांना एकूण एक काेटी ५७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला असून तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करत आहेत.

हेही वाचा: