नाशिकमध्ये १८ जणांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत असून, गेल्या आठवडाभरातच शहरातील १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेची झोप उडविणारा ठरला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय विभागामार्फत युद्धपातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. विशेषत: रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन ॲन्टिजेन तपासण्या केल्या जात आहेत.

केरळपाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. किंबहुना देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाला रोखण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करत राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपायययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दोनच दिवसांत नाशिक शहरातही कोरोनाचे तीन रुग्ण आढळले होते. महात्मानगरमधील ३२ वर्षीय महिलेला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. महात्मानगर परिसरातीलच एक अन्य ४२ वर्षीय महिलेला सर्दीचा त्रास झाला. ॲन्टिजेन चाचणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. अंबड परिसरातील २४ वर्षीय युवकही ॲन्टिजेन चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. यानंतर महापालिकेने केलेल्या तपासणीत तब्बल १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

१६०९ जणांच्या कोरोना चाचण्या

कोरोनाची लक्षणे आढळलेल्यांपैकी १५०६ जणांच्या ॲन्टिजेन, तर १०३ जणांच्या आरटीपीसीआर अशा एकूण १६०९ जणांच्या चाचण्या महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आल्या. यात १८ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. या रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी सांगितले.

डेंग्यू बाधितांचा आकडाही ११ वर

एकीकडे कोरोनाने डोके वर काढले असताना, डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भावही कायम असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात ३१ संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यात नाशिक पूर्व, पंचवटी, नाशिकरोड विभागांतील प्रत्येकी दोन, सिडकोतील चार, तर सातपूर विभागातील एकाचा समावेश आहे.

सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळल्यास संशयित रुग्णांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत कोरोना चाचणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतराचे पालन करावे.

– डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, मनपा.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये १८ जणांना कोरोनाची लागण appeared first on पुढारी.