नाशिक ‘आयजी’पदी कराळेच; डॉ. बी. जी. शेखर यांच्या नियुक्तीचे आदेश प्रलंबित

IG Nashik pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने (कॅट) दि. ५ मार्च रोजी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदाची सूत्रे डॉ. बी. जी. शेखर यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय दिला आहे. मात्र शासनाने त्यासंदर्भातील आदेश अद्याप काढलेले नाहीत. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी अद्याप दत्तात्रय कराळे कायम आहेत.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले, तर सहायक व उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली. त्यानुसार बहुतांश अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होत कामकाजास सुरुवात केली आहे. दरम्यान, गृह विभागाने डॉ. बी. जी. शेखर यांची बदली करून त्यांच्या जागी ठाणे शहराचे सहआयुक्त दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती केली होती. कराळे यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी नाशिक परिक्षेत्राची सूत्रे हाती घेतली. परंतु, डॉ. बी. जी. शेखर यांनी ‘कॅट’मध्ये याचिका दाखल केली होती. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी तसेच मेअखेरीस निवृत्ती असतानाही बदलीचे आदेश निर्गमित केल्याचा दावा डॉ. शेखर यांनी याचिकेत केला होता. त्यानुसार ५ मार्च रोजी ‘कॅट’ने (Central Administrative Tribunal (CAT)) अंतिम निर्णय देत डॉ. शेखर यांच्या बदलीस स्थगिती देत पुन्हा नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर गृह विभागाने सुधारित आदेश काढले नसल्याने डॉ. शेखर यांची नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे दत्तात्रय कराळे यांच्याकडेच परिक्षेत्राची जबाबदारी आहे.

The post नाशिक 'आयजी'पदी कराळेच; डॉ. बी. जी. शेखर यांच्या नियुक्तीचे आदेश प्रलंबित appeared first on पुढारी.