नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान

टँकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाच्या वाढत्या कडाक्यासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. गावोगावी नैसर्गिक स्रोत कोरडेठाक झाल्याने तेथील ग्रामस्थांना प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात सध्या 55 गावे-वाड्यांना 31 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जाते.

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा 40 अंशांपलीकडे पोहोचल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच ग्रामीण भागाला पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागत आहे. गावोगावी स्रोत आटल्याने तेथील जनतेला पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत पाच तालुक्यांतील 55 गावे-वाड्यांना 10 शासकीय व 21 खासगी अशा एकूण 31 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याद्वारे तब्बल 69 हजार ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. टंचाईच्या सर्वाधिक झळा येवला व मालेगाव तालुक्यांना बसत आहेत. येवल्यात सर्वाधिक 18 टँकरच्या फेर्‍या सुरू आहेत. या टँकरच्या सहाय्याने 31 गावे आणि वाड्यांची तहान भागविली जात आहे. त्या खालोखाल मालेगावी 8 टँकर धावत असून, 15 गावे-वाड्यांमधील पाण्याचा प्रश्न तूर्तास मार्गी लागला आहे. याशिवाय चांदवडला सहा ठिकाणी 3; बागलाणला दोन गावांसाठी 1, तर देवळ्यात एका गावासाठी एक टँकर सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने टँकरच्या 50 फेर्‍या मंजूर असून, प्रत्यक्षात तेवढ्याच फेर्‍या होत आहेत.

11 विहिरी अधिग्रहित
ग्रामीण भागात टँकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने मालेगावला 11 आणि देवळ्यात 3 अशा एकूण 11 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. उन्हाचा कडाका पाहता, येत्या काळात ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.

टँकरची सद्यस्थिती
तालुका                            संख्या
येवला                               18
मालेगाव                            08
चांदवड                             03
बागलाण                            01
देवळा                               01

हेही वाचा:

The post नाशिक : एकतीस टँकर भागवताय ग्रामीण भागातील तहान appeared first on पुढारी.