नाशिक : कांदा सडल्याने फावड्याने उचलून फेकण्याची वेळ

कांदा सडला,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा प्रंचड प्रमाणात खराब झाला होता. तशाही परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अवाच्या सवा खर्च करून कांदा काढून तो चाळीत साठवला. परंतु एक दीड महिन्यातच चाळीतला कांदा सडल्याने त्याला फावड्याने उचलून फेकण्याची वेळ तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा हे नगदी पीक असून, मिळेल त्या भावाने महागडे कांदा बियाणे खरेदी करून उन्हाळी कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. ऐन काढणीच्या काळात ढगाळ वातावरण, अवकळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी हवालदिल झाला. उन्हाची तमा न बाळगता मोठ्या काबाडकष्टाने कांद्याची साठवणूक केली. मात्र, महिनाभरात तो खराब होत असल्याने खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या मार्केटमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक असून, भाव कवडीमोल मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

मागील लाल कांद्याचे अनुदान अद्याप मिळाले नाही. त्यात उन्हाळी कांद्याला भाव नाही. चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी अशा दुहेरी-तिहेरी संकटात सापडला आहे. शासनाने याची दखल घेऊन कांद्याला किमान हमीभाव जाहीर करावा व जाहीर केलेले अनुदान तत्काळ अदा करून दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. तालुक्यातील विठेवाडी शिवारातील धनंजय बोरसे यांनी एप्रिल महिन्यात साठवणूक केलेला कांदा खराब झाल्याने तो फावडे लावून फेकण्याची वेळ आली आहे.

१०/१२ एकर कांदा लागवडीसाठी व चाळीत साठवणूक करेपर्यंत लाखो रुपये खर्च केला. मात्र, महिना दीड महिन्यातच चाळीतला संपूर्ण कांदा सडल्यामुळे त्याला मजूर लावून उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे ३० गुंठे टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी ७०/७५ हजार रुपये खर्च करून पदरात काहीच पडले नाही. तोही मजूर लावून‌‌‌ उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

– धनंजय बोरसे, कांदा उत्पादक शेतकरी, सावकी (विठेवाडी)

 

 

आजच्या घडीला कोणत्याच शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडला असून, अवकाळी पाऊस व गारपीटमुळे तो आधीच त्रस्त असतानाच त्याने लाखो रुपये खर्चून पिकवलेला कांदा चाळीत सडतो आहे. शासनाने कांद्यासाठी अनुदान जाहीर केले परंतु त्यालाही पाय फुटून ते व्यापारी व दलालांच्या घशात जाण्याची शक्यता आहे.

– कुबेर जाधव, संपर्कप्रमुख राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

हेही वाचा :

The post नाशिक : कांदा सडल्याने फावड्याने उचलून फेकण्याची वेळ appeared first on पुढारी.