नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान

kille mulher www.pudhari.news

नाशिक (नामपूर) : पुढारी वृत्तसेवा
येथील समाजश्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी बागलाण तालुक्यातील किल्ले मुल्हेर येथे प्लास्टिकमुक्त अभियान राबविले. गडाचा पायथा ते टोकापर्यंत श्रमदान करीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बॉटल, पाऊच, गुटखा, चॉकलेटचे खाऊन फेकलेले प्लास्टिक, विविध कागद व खराब कपडे संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. किल्ला प्लास्टिकमुक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना मानाचा मुजरा करण्यात आला.

प्लास्टिकमुक्त अभियानाबरोबरच स्वयंसेवकांनी किल्ल्याचे शिवकालीन कोरीव काम, किल्ल्यावरील पाण्याचे टाके, तलाव, दगडी पायर्‍या यांची स्वच्छता केली. खडक कोरून तयार केलेले छोटे छोटे पात्र, प्रवेशद्वाराचे नक्षीकाम, अवघड जागेवरून चढण्यासाठी तयार केलेल्या कोरीव पायर्‍या, शत्रूचे आक्रमण ओळखू यावे यासाठी केलेल्या छोट्या छोट्या गुफा, राहण्यासाठी किल्ल्याच्या पोटातच केलेली घरे या सर्व व्यवस्थेचे निरीक्षण करीत विद्यार्थ्यांनी या वारसाचे जतन करण्याची शपथ घेतली. आगामी काळात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बागलाण तालुक्यातील सर्व ऐतिहासिक किल्ले प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. किल्ले मुल्हेर प्लास्टिकमुक्त करत खाली येताना विविध प्रकारची रानफुले, किल्ल्याच्या सुंदरतेची झलक देणार्‍या ऐतिहासिक तोफा, शिवलिंग आणि निसर्गरम्य वातावरण न्याहाळत स्वयंसेवकांनी निरोप घेतला. त्यांना प्राचार्य डॉ. यु. बी कदम यांचे मार्गदर्शन लाभले. प्लास्टिकमुक्त अभियानाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागप्रमुख प्रा. हर्षल बच्छाव, प्रा. सुनील वसावे यांनी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : किल्ले मुल्हेरपासून सुरु झाले प्लास्टिकमुक्त अभियान appeared first on पुढारी.