नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेत तब्बल अडीच तास ठाण मांडत जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांची चांगलीच झाडाझडती घेतली. सोमवारी (दि. २९) दुपारी 12.30 च्या सुमारास झिरवाळ यांनी अचानक जिल्हा परिषदेत एन्ट्री करत सामान्य प्रशासन विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्या दालनात जात प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी सुमारे अडीच तास चर्चा केली. त्यामुळे झिरवाळांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती.
विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी थेट जिल्हा परिषद गाठले. येथे प्रामुख्याने ग्रामसेवकांच्या बदल्या, जलजीवन मिशनची कामे, लघुपाट बंधारे विभागामार्फत होत असलेल्या जलयुक्त शिवारची सद्यस्थिती तसेच शिक्षण, आरोग्य या विभागांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी ग्रामसेवकांच्या बदल्यांबाबत झिरवाळ यांनी लोकप्रतिनीधींना कोणतीही माहिती न देता, या बदल्या होत असल्याची तक्रार केली. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर आता झिरवाळांनीही हा विषय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
रात्रभर केलेल्या आंदोलनाची आठवण जागी
पाच वर्षांपूर्वीही मतदारसंघातील विकासकामांची फाइल हरवल्या प्रकरणी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रात्रभर थांबून आंदोलन केले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत झिरवाळांनी केलेल्या या अचानक भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
हेही वाचा:
- सर्वेक्षणासाठी दोन दिवसांची मुदतवाढ
- Budget 2024 session : राष्ट्रपती मुर्मू यांचे आज अभिभाषण; उद्या सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार
- Test Cricket : डावखुर्या विदेशी फिरकीपटूंची भारताविरुद्ध कसोटीतील संस्मरणीय कामगिरी
The post नाशिक : ग्रामसेवक बदल्यांमध्ये लोकप्रतिनिधींना डावलले जात असल्याने भेट appeared first on पुढारी.