म्हसरूळमधील थरार : काटा काढण्याचा प्रयत्न पत्नीच्या अंगलट, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल

क्राईम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खर्चासाठी आपणास पैसे देत नसल्याच्या कारणातून पत्नीने पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हसरूळ येथील बोरगड परिसरात घडली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे पत्नीने एकाच्या मदतीने पतीवर घरातच प्राणघातक हल्ला केला व सर्पदंश घडवून आणत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने संशयितांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत मित्राच्या मदतीने जिल्हा रुग्णालय गाठल्याने त्याचे प्राण बचावले आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटावा, असा हा प्रकार पाहून म्हसरूळ पोलिसही चक्रावून गेले आहेत. म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पोपटराव पाटील (४१, रा. उज्ज्वलनगर) यांचा फिल्मी स्टाइलने काटा काढण्याचा प्रयत्न पत्नी सोनी उर्फ एकता राजेंद्र जगताप तसेच अन्य अनोळखी व्यक्तीने शनिवारी (दि. २७) रात्री केला. विशाल यांच्या फिर्यादीनुसार, एकताने विशाल यांना बिअर पाजली. त्यानंतर जेवण देण्याच्या बहाण्याने घराच्या मागील दरवाजातून एका संशयिताला घरात घेतले. दोघांनी मिळून विशालवर प्राणघातक हल्ला केला. विशालने प्रतिकार केल्यावर एकताने उशीने विशाल यांचे तोंड दाबून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही झटापट सुरू असताना घरात शिरलेल्या संशयिताने बॅगेतून साप काढून विशाल यांच्या मानेजवळ नेताच सापाने दंश केला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या विशाल यांनी दोघांच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून घेत घराबाहेर पळ काढला. त्यानंतर मित्रांच्या मदतीने विशाल जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. वेळीच उपचार मिळाल्याने विशाल यांचा जीव वाचला. म्हसरूळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या पथकाने विशाल यांच्याकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर म्हसरूळ पोलिस ठाण्यात विशाल यांची पत्नी आणि तिला मदत करणारा संशयित अशा दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिखर्चावरून खटके
संशयित एकताला अतिखर्च करण्याची सवय असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यावरून दोघा पती-पत्नीमध्ये अनेकदा वादही झाले. आर्थिक परिस्थिती सामान्य असल्याने आवाक्यात खर्च करण्याची मागणी विशाल करीत होते. त्यावरून काही महिन्यांपूर्वी एकता घर सोडून मैत्रिणीकडे परजिल्ह्यात राहण्यास गेली होती. विशाल यांनी तिची समजूत काढून नाशिकला आणले होते. त्यानंतर काही महिने आनंदात संसार केल्यानंतर अचानक एकताने प्राणघातक हल्ला करत काटा काढण्याचा प्रयत्न केला.

पत्नीनेच पाजली बिअर
शनिवारी सायंकाळी एकताने विशाल यांना बिअर आणण्यास सांगितली होती. मात्र पैसे नसल्याचे कारण देत विशाल यांनी नकार दिला होता. त्यामुळे एकताने स्वत:कडील पैसे देत बिअर आणण्यास सांगितले होते. त्यानंतर घरी आल्यावर एकताने विशाल यांना बिअर पिण्यास सांगितले व लहान मुलीला झोपवण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेली होती. मुलगी झोपल्यानंतर एकता पुन्हा विशाल यांच्याकडे आली. त्यांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवत घराच्या मागील बाजूने संशयितास घरात घेतले होते.

घरात कोणीतरी शिरले?
संशयिताला घरात घेतल्यानंतर त्याने विशाल यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी एकता हा प्रकार बघत होती. त्यामुळे विशाल यांनी, ‘काय प्लॅन आहे?’ असे विचारताच आपल्या घरात कोणीतरी शिरले, असे सांगत एकतानेही मारेकऱ्यास मदत केली. तिने उशीने विशाल यांचे तोंड दाबले, तर दुसऱ्या संशयिताने बॅगेतून साप काढून विशाल यांच्याजवळ नेताच त्याने मानेला दंश केला. सर्पदंश होताच तू दोन तासांत मरशील, असा दमही संशयिताने दिला. परंतु त्यानंतर विशाल दोघांना प्रतिकार करीत तेथून सुटका करून घेत घराबाहेर पडल्याने विशाल यांचा जीव वाचला.

एकताचीही पोलिसांकडे धाव
विशाल प्रतिकार करून पळून गेल्याने एकता यांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठत, आमच्या घरात कोणीतरी हल्ला केला, असा दावा करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा दाखल करू, असे सांगितले. दरम्यान, विशाल यांच्यावर हल्ला होऊन सापाने चावा घेतल्याची माहिती म्हसरूळ पोलिसांना जिल्हा रुग्णालयातून आलेल्या फोनवरून समजली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने रुग्णालयात जाऊन काय प्रकार आहे, याची तपासणी केली. आपला बनाव उघडकीस येताच एकताने पोलिस ठाण्यातून पळ काढला.

घोणस सापाचा वापर
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल यांना मारण्यासाठी संशयितांनी घोणस या अतिविषारी सापाचा वापर केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेळीच उपचार मिळाल्यामुळे विशाल यांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. या गुन्ह्यातील दुसरा संशयित सर्प हाताळणारा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

विशाल यांनी एमसीएस शिक्षण घेतले असून, ते सातपूर येथील कंपनीत कामास आहेत. संशयितांना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस लवकरच संशयितांना पकडतील. – किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक.

The post म्हसरूळमधील थरार : काटा काढण्याचा प्रयत्न पत्नीच्या अंगलट, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.