नाशिक पुढारी वृत्तसेवा – जिल्हा परिषदेमधील वेगवेगळ्या विभागातील विविध कारणांनी पाच जणांच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी काढले आहेत. त्यामुळे बेशिस्तीचे वर्तन करणाऱ्यांना यातून चाप बसणार आहे. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ग्रामपंचायत विभागाच्या दोन, बांधकाम विभागाच्या दोन, शिक्षण विभागाच्या तीन तर आरोग्य विभागाच्या एकाचा समावेश आहे.
शिक्षण विभागातील दिंडोरी तालुक्यातील सहविचार सभेत दोन शिक्षकांची हाणामारी करतांनाची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. त्यावर निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत तसेच जिल्हा परिषद शाळा वाडीवर्हे (ता. इगतपुरी) येथे सीईओ मित्तल यांनी एप्रिल महिण्यात भेट दिली होती तेव्हा शाळेत कुणीही हजर नव्हते. पुर्वसूचना देऊनही शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने मुख्याध्यापक यांचे निलंबन करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागातील वडनेर भैरव प्राथमिक आरोग्य केंद्र (ता. चांदवड) येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या कामकाजाविषयी वारंवार तक्रारी होत होत्या. त्यानुषंगाने सीईओ मित्तल यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे पथक पाठवले होते. त्यांच्या अहवालामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळले. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेले रुग्ण असतांना त्यांची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न कळवता गैरहजर असल्याचे आढळले असल्याने चौकशी अहवाल सीईओ मित्तल यांना सादर करण्यात आला आहे. त्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवकांच्या संघटनांकडून ग्रामपंचायत विभागातील प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेले ग्रामसेवक यांच्याबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने सीईओ मित्तल यांनी ग्रामसेवक यांना पंचायत समिती चांदवड येथे मूळ आस्थापनेवर कार्यमुक्त करण्याचे निर्देश संबंधित विभागास दिले. तसेच वळवाडी ता. मालेगाव येथील ग्रामसेवक यांनी यापूर्वी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत नागझरी/ हाताणे येथील दप्तर तपासणीसाठी दिलेले नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत निमशेवाडी येथील लेखापरीक्षण केलेले नाही. त्यामुळे त्याच्या निलंबनाचे आदेश सिईओंनी दिले आहे.
लाचखोर उपअभियंताही निलंबित
सुरगाणा पंचायत समिती येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना ४० हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्याच्या निलंबन निलंबन करण्यात आले आहे. तसेच बागलाण पंचायत समिती येथील उपअभियंता यांच्याबाबत देखिल काही आर्थिक कारणांवरून तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात संबंधित उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हेही वाचा: