नाशिक : जिल्ह्यातील १५० गावे होणार पाणीदार

पाणीदार गावे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा परिषदेने जिल्ह्यात पिकांना पाण्याची टंचाई नको म्हणून पाणी जिरवण्यासाठी बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला मिशन भगिरथी असे नाव देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून १२ तालुक्यांत ६०० कामे होणार आहेत. या कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा उपयोग करण्यात येणार आहे. मिशन भगिरथी अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची रक्कम अंदाजे १०० कोटी रुपये इतकी आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १२ तालुक्यांतील १५० गावांचा समावेश आहे.

पाण्याचा प्रश्न हा संपूर्ण आदिवासी भागाचा प्रश्‍न असल्यामुळे त्यांनी रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी मिशन भगिरथी हा उपक्रम राबवण्याच्या सूचना जि. प. सीईओ मित्तल यांनी जलसंधारण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्‍चित केली आहेत. यामध्ये सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडेारी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमधील १५० गावांचा समावेश आहे.

प्रत्येक गावामध्ये पाच ते सहा बंधारे बांधण्यात येणार आहेत. यात पाच ते ३० लाख रुपयांच्या मर्यादेत गरजेनुसार बंधाऱ्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांचा ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात या कामांना ग्रामपंचायत विभागाकडून प्रशासकीय मान्यता दिल्या जातील व मार्चपासून या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

तालुका    गावांची संख्या     कामांची संख्या

दिंडोरी             १५               ६४

पेठ                 २७                ७४

कळवण           १८               ६०

सुरगाणा          २१               ११४

सटाणा              ९                ४४

देवळा                 ८              ३२

इगतपुरी              ५              १३

त्र्यंबकेश्‍वर           १२             ४६

चांदवड                १०             ३७

मालेगाव               ७              ५०

येवला                  ३              १५

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील १५० गावे होणार पाणीदार appeared first on पुढारी.