नाशिककरांना सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हीटचा अनुभव

Nashik temperature,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहर व परिसरात पावसाच्या दडीसोबत हवेतील उष्म्यात वाढ झाली आहे. शहरातील कमाल तापमानाचा पारा ३०.८ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे एेन मान्सूनच्या हंगामात नाशिककर घामाघूम झाले असून, त्यांना आॅक्टोबर हीटचा अनुभव येत आहे.

अल निनोच्या प्रभावामुळे चालूवर्षी मान्सूनला ब्रेक लागला आहे. पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी अद्यापही अपेक्षित पर्जन्याअभावी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच तीन दिवसांपासून शहर व परिसरातील तापमानात मोठा बदल झाला आहे. दिवसा उन्हाचा चटका बसतो आहे. तर रात्रीच्या सुमारास हवेत गारवा निर्माण होत आहे. या विचित्र हवामानामुळे शहरवासीय चांगलेच हैराण झाले आहेत.

आॅगस्टच्या अखेरच्या दिवशी शहरात किमान तापमानाचा पारा २०.९ अंशांवर पोहोचला आहे. तर कमाल तापमान ३० अंशांपलीकडे जाऊन पोहोचले आहे. परिणामी हवेतील आर्द्रता नाहीशी झाली असून, उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. दुपारी १२ ते ३ यावेळेत उन्हाचा अधिक तडाखा जाणवत आहे. त्यामुळे पावसाळ्याचा हंगाम सुरू असताना सर्वसामान्यांना आॅक्टोबर हिटचा प्रत्यय येतो आहे. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी कपाटात ठेवलेल्या टोप्या तसेच महिलांनी स्कार्फ बाहेर काढले आहेत. दरम्यान, पावसाचा लहरीपणा कायम राहिल्यास येत्या काळात उन्हाचा तडाखा अधिक जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ग्रामीणमध्ये जनजीवन ठप्प

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही पावसाने आखडता हात घेतला आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतजमिनी भेगाळल्या आहेत. त्यासोबत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. परिणामी शेतीची कामे थंडावली असून, उन्हामुळे जनजीवनदेखील ठप्प होत आहे.

नाशिकचे कमाल तापमान

तारीख अंश सेल्सिअस

२५             27.4

२६             27.9

२७             27.5

२८             29.2

२९             30.4

३०             30.8

31              31.7

हेही वाचा :

The post नाशिककरांना सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हीटचा अनुभव appeared first on पुढारी.