निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षाच्या निर्यातीला सुरुवात झाली असून, नेदरलँड आणि रोमोनिया या देशांमध्ये ७१ कंटेनरमधून ९८० मेट्रिक टन द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीनं जगाला भुरळ घालणाऱ्या नाशिकच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. (Grape export)
द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन २०२२-२३ हंगामात तब्बल दोन लाख ६७ हजार ९५० मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २,५४३ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. यंदा द्राक्ष पिकाला पोषक वातावरण होते. त्यामुळे ३८ हजार ४३२ द्राक्षबागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. भारतीय शेतमाल आणि फळबागेला बांगलादेश येथे मोठी मागणी आहे. केंद्र सरकारने बांगलादेशामध्ये द्राक्षनिर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन वाहतूक खर्च आणि ड्यूटी कमी केली तर द्राक्षनिर्यातीस वाव मिळेल. तसेच केंद्र सरकारने द्राक्षनिर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठ शोधून आपल्याकडील शेतमाल जास्तीत जास्त कसा निर्यात होईल, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गुणवत्ता वाढली तरी द्राक्षाच्या देशांतर्गत बाजारातील तसेच निर्यातीच्या बाजारातील असुरक्षितता मात्र कायमच आहे. सततचे प्रतिकूल वातावरण, वाढता उत्पादन खर्च आणि मजूर टंचाई या अडथळ्यांवर मात करीत जिद्दी द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीची झेप उंचावतच ठेवली आहे. गोड चवीच्या रसाळ व करकरीत द्राक्षांनी गुणवत्तेच्या जोरावर जागतिक बाजारात स्थान निर्माण केले आहे. पर्यावरणीय बदलामुळे शेतीव्यवसाय दिवसेंदिवस आतबट्ट्याचा ठरत आहे. सिंचन सुविधा जरी असली तरी रोज बदलत असलेल्या हवामानाला समर्थपणे तोंड देऊ शकेल, अशी कोणतीही शाश्वत व्यवस्था नाही. यामुळे शेती करणे जिकिरीचे तर झाले आहेच, पण उत्पादित मालाला बाजारात हवा तसा दर मिळेल, याचीही खात्री उरलेली नाही. बऱ्याचवेळा मालाचे उत्पादन एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी जादा झाल्याने भाव पडतात. तसेच शासनाचे आयात-निर्यात धोरणही कारणीभूत आहे. अशा अनेक अडचणींवर मात करत जिद्दी शेतकऱ्यांनी द्राक्षनिर्यात केली आहे. (Grape export)
या देशात होते निर्यात
नेदरलँड, युनायटेड किंग्डम, जर्मनी, लटवीया, डेन्मार्क, स्वीडन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, पोलंड, बेल्जियम, फिनलॅंड, इटली, स्पेन आदी देशांत पाठविण्यात येतात.
द्राक्ष निर्यात आलेख
२०१७-१८ -१८८२२१ मे. टन- १,९०० करोड
२०१८-१९ -२४६१३३ मे. टन- २,३३५ करोड
२०१९-२० -१९३६९० मे. टन- २,१७७ करोड
२०२०-२१ – २४६१०७ मे. टन- २,२९८ करोड
२०२१-२२ – २६३०७५ मे. टन- २,३०२ करोड
२०२२-२३ – २६७९५० मे. टन- २,५४३ करोड
हेही वाचा :
- 650 फुटांवरून सावज हेरतो हार्पी गरुड
- पीक राखण्यासाठी आता लेसर बुजगावणे!
- मालदीवच्या सत्तारूढ सरकारची खाेल समुद्रात कॅबिनेट बैठक; गूढ विषयावर आत्मचिंतन, सरकार 30 मिनिटे पाण्याखाली!
The post नाशिक जिल्ह्यातून द्राक्षनिर्यातीचा श्रीगणेशा appeared first on पुढारी.