नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा

दिक्षी,www.pudhari.news

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भार नियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीज पुरवठा करावा यासाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीज पुरवठ्याबाबत निवेदन दिले. तातडीने वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तापमान वाढत आहे, द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. तापमान वाढल्यामुळे द्राक्ष, गहू, कांदा, भाजीपाला या पिकांना नित्याने पाणी द्यावे लागत आहे. मात्र सातत्याने वीज पुरवठा खंडित होणे, वीज ट्रीप होणे, शाॅट सर्किट होणे, देखभाली अभावी ट्रान्सफॉर्मर जळणे, वीज तारा लोंबकळणे असे प्रकार होत आहे. त्यामुळे शेतमालाची होरपळ सुरू झाली असून शेतकरी त्रस्त झालेले आहेत. सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतमाल उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. याचा विचार करून आठ तास अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

सुरळीत वीज पुरवठ्या अभावी द्राक्षबाग, गहू, कांदा, भाजीपाला या शेतमालावर होणारे परिणाम, शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप शेतकऱ्यांचा बोलण्यात दिसून येत होता.  विशेष म्हणजे सद्या स्थितीत परिसरातील अनेक शेतकरी नियमित कृषीपंपाचे बिल भरत असूनही अशी परिस्थिती होते. हे योग्य नाही, याशिवाय फिल्डवर काम करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत सौजन्याने वागणे व बोलण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तर सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांनी शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शेतपंपांना सुरळीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. शेतीसाठी वीजपुरवठा सुरू असताना मेंटेनन्स ची कामे शक्यतो केली जाणार नाही असेही आश्वासन अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आले.

याप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे, आनंद बोराडे, विनायक चौधरी, अरुण घुगे, डॉ. योगेश्वर चौधरी, देविदास चौधरी, योगेश चौधरी, दशरथ वणवे, राजेंद्र आव्हाड, सुनील चौधरी, रावसाहेब चौधरी, वसंत चौधरी, भूषण धनवटे, अंबादास चौधरी, रंगनाथ गांगुर्डे, सुभाष हळदे, चंद्रभान हळदे, विक्रम चौधरी, ज्ञानेश्वर तांबडे, रामभाऊ चौधरी, प्रकाश कातकाडे, दिलीप धनवटे, संतू बोराडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

सध्या तापमान वाढत आहे. द्राक्ष हंगाम सुरू झाला असून द्राक्ष बागेसह कांदा, गहू, भाजीपाला या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. मात्र सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. नियमीत होणाऱ्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो याचा विचार करून सलग आठ तास सुरळीत वीजपुरवठा करावा

अर्जुन बोराडे
शेतकरी संघटनेचे नेते

 

तांत्रिक कारणाव्यतरिक्त सर्व ग्राहकांना अखंडित विज पुरवठा करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणार आहोत. तसेच ग्राहकांनी अनाधिकृतपणे आकडे टाकून किंवा मिटर मध्ये छेडछाड करून विज वापरु नये. अनाधिकृतपणे विज वापरामुळे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे व अशा ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

योगेश्वर पाटील
उप कार्यकारी अभियंता
ओझर उपविभाग

हेही वाचा :

The post नाशिक : दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on पुढारी.