नाशिक : दिवाळीनिमित्त रात्रपाळीतील १५ घंटागाड्या सुरू

घंटागाडी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त शहर परिसरात निर्माण होणारा अतिरिक्त कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेने रात्रपाळीतील अतिरिक्त १५ घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या माध्यमातून शहरातील बाजारपेठांच्या परिसरातून दररोज सरासरी १२ टन अतिरिक्त कचरा संकलित केला जात आहे.

कोटीच्या कोटी उड्डाणांनंतरही घंटागाडीचा तंटा कायम राहिला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर घंटागाडीच्या अनियमिततेच्या चौकशी अहवालावर उशिराने का होईना कारवाई सुरू झाली आहे. सहाही विभागांतील चारही घंटागाडी ठेकेदारांना प्रशासनातर्फे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ‘स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक’ची बिरूदावली मिरवणाऱ्या महापालिकेने घंटागाडीवर शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र केंद्राच्या ‘स्वच्छ शहर’ स्पर्धेत अव्वल येण्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकलेले नाही. कचराकुंडीमुक्त शहर संकल्पनेतून घंटागाडी योजना राबविली जात असली तरी झोपडपट्ट्या, कामगार वस्ती तसेच बाजारपेठांच्या ठिकाणी असलेले कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट स्वच्छ शहर स्पर्धेतील महापालिकेच्या क्रमवारीत होणाऱ्या घसरणीस कारणीभूत ठरले आहेत.

दिवाळीनिमित्त बाजारपेठांच्या परिसरात होणाऱ्या अतिरिक्त कचऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील बाजारपेठांमध्ये सकाळ आणि रात्री अशा दोन सत्रांत कचरा संकलन सुरू केले आहे. त्यासाठी सहाही विभागांत आवश्यकतेनुसार १५ अतिरिक्त घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागाड्यांद्वारे गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठांच्या परिसरात रात्रपाळीत केरकचरा संकलन केले जात आहे. या माध्यमातून दररोज सुमारे १२ टन अतिरिक्त कचरा संकलित करून खतप्रकल्पावर वाहून नेला जात आहे.

दिवाळीनिमित्त शहरातील प्रामुख्याने बाजारपेठांच्या परिसरात सकाळ आणि रात्री अशा दोन सत्रांत केरकचरा संकलन केले जात आहे. यासाठी १५ अतिरिक्त घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट निर्माण होऊ नये, यासाठी ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आली आहे. – डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग

 

हेही वाचा :

The post नाशिक : दिवाळीनिमित्त रात्रपाळीतील १५ घंटागाड्या सुरू appeared first on पुढारी.