नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे

मनरेगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळांमुळे मजुरांची पावले मनरेगाकडे वळत आहेत. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ हजार ८४१ कामांवर तब्बल ११ हजार ४७७ मजुरांनी हजेरी लावली.

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवतो आहे. तीव्र उन्हामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे थंडावली आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांवर अवलंबून असलेला संसाराचा गाडा हाकणाऱ्या मजुरांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. संकटाच्या या काळातच शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) मजुरांसाठी संजीवनी ठरते आहे. मनरेगाच्या माध्यमातून हक्काचा रोजगार मिळत असल्याने मजुरांनीही त्यांचा मोर्चा या कामांकडे वळविला आहे.

‘मनरेगा’अंतर्गत जिल्ह्यात सध्या १ हजार ८४१ कामे सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर १ हजार ३५९ कामे प्रगतिपथावर असून, यंत्रणांच्या पातळीवर ४८२ कामे केली जात आहेत. यात प्रामुख्याने घरकुल, रस्ते बांधणी, विहीर, वृक्षलागवड, फळबागा लागवड, कॅटल व गोट शेड उभारणी, सिमेंट नाला, पेव्हर ब्लॉक बसविणे, शोषखड्डे, मातीनाला बांध, शौचालये उभारणी यासारख्या विविध ३२ कामांचा समावेश आहे. या कामांवर ११ हजार ४७७ मजूर कार्यरत आहेत. दरम्यान, येत्या काळात जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील जनतेकडून या कालावधीत मनरेगावरील कामांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. त्यामुळे ही शक्यता गृहित धरून जिल्हा प्रशासनाने कामांचे नियोजन केले आहे. तसेच मागणीनुसार मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना यंत्रणा व गावपातळीवर देण्यात आल्या आहेत.

तालुकानिहाय मजूर उपस्थिती

येवला १८२२, इगतपुरी १३०४, नांदगाव १२२४, पेठ १२००, बागलाण १०६३, निफाड ९८०, मालेगाव ६८२, देवळा ६२८, कळवण ६१२, सुरगाणा ५९९, सिन्नर ५५३, नाशिक २९०, चांदवड २५७, दिंडाेरी २०३, त्र्यंबकेश्वर १८९.

हेही वाचा:

The post नाशिक : दुष्काळाच्या झळांमुळे ११ हजार मजुरांची पावले मनरेगाकडे appeared first on पुढारी.