नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट

ghoti www.pudhari.news

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील धारगाव (वैतारणा) हे आदिवासी अतिदुर्गम भागातील महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र येथील वैद्यकीय आधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे सातत्याने चर्चेत आहे.

आदिवासी अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी एकीकडे शासन इमारतीसह कर्मचारी सुख-सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत असतानाही आधिकारी व कर्मचारी यांचे मात्र कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्षच आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी वा आधिकारी निवासी नसतो.

धारगाव प्रा. आ. केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे. दोन वैद्यकीय अधिकारी असतानाही मुख्यालयी कुणीही थांबत नाही. कधी कधी केंद्र केवळ शिपायाच्या भरवशावर टाकले जाते. परिचारिकांनाच कामाला जुंपले जाते. – गोविंद पुंजारा, माजी सरपंच, धारगाव.

सर्वच जण नाशिक, घोटी आदी शहरांतून ये-जा करतात. रात्री तर हे केंद्र चक्क बंदच असते, असा आरोप नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळी रुग्णासाठी आरोग्य केंद्र कुचकामी ठरत असून तातडीच्या उपचारासाठी 25 ते 30 कि.मी.अंतरावरील घोटी वा खोडाळा ही शहरे गाठावी लागतात. मग या प्रा. आ. केंद्राचा उपयोग तरी काय? ही केंद्रे केवळ आधिकारी व कर्मचारी यांनाच पोसण्यासाठी आहेत का? असा संतप्त सवाल करत या केंद्राची सेवा सुधारली नाही, तर या केंद्राला टाळे ठोकले जाईल, असा इशारा येथील संतप्त नागरिकांनी दिला आहे.

इगतपुरी तालुका हा आदिवासीबहुल अतिदुर्गम आहे. शासन येथे उत्तम आरोग्यसेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र आधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करतात. उत्तम आरोग्य सेवा पुरवा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. – गोरख बोडके, माजी जि. प. सदस्य.

एकीकडे आदिवासी भत्ता, घरभाडे भत्ता आदींसह भरभक्कम वेतन घेणारे कर्मचारी व अधिकारी धारगाव परिसरात निवासी राहात नाहीत. या अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशासन व लोकप्रतिनिधीच पाठीशी घालत असतात. मग आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजणार नाही तर काय होणार ? – नवनाथ गायकर, सामाजिक कार्यकर्ते.

हेही वाचा:

The post नाशिक : धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा मनमानी कारभार; रुग्णांची ससेहोलपट appeared first on पुढारी.