नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट

नाशिक महसील कार्यालय www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंधरा दिवसांपूर्वी नियुक्ती मिळालेल्या नाशिक तहसीलदारांनी त्यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. जुन्या कार्यालयाची पूर्णत: तोडफोड करताना नवीन दालन उभारणीच्या कामात त्यांनी जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे आपल्या चकाचक दालनासाठी आग्रही असलेल्या तहसीलदारांनी कार्यालयात येणार्‍या सामान्यांच्या सोयी-सुविधांमध्येही जरा लक्ष द्यावे, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रंगली आहे.

गेल्या महिन्यात महसूल विभागात खांदेपालट झाली. या बदल्यांवेळी काही अधिकार्‍यांना अपेक्षित ठिकाणी नियुक्ती मिळाली. काहींच्या पदरी निराशा आली. या सर्व बदलीनाट्यात नाशिक तहसीलदारपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. शासनाने विभागीय आयुक्तालय कार्यालयातील नरेश बहिरम यांची नाशिक तहसीलदारपदी बदली केली. बहिरम यांनी तहसीलचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम त्यांच्या दालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. जुन्या दालनाची संपूर्णत: तोडफोड करून त्याठिकाणी बहिरम यांच्या मनातील रचनेप्रमाणे कामकाज उभे राहते आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधीही मंजूर केल्याचे कळते आहे. त्यामुळे एरवी एखाद्या साध्या कामासाठी निधी मिळवताना यंत्रणांची दमछाक होत असतानाच तहसीलदारांच्या दालनावर ‘होऊ द्या खर्च’ सुरू आहे. वास्तविक तहसील कार्यालयातील अन्य दालनांची सध्या दुरवस्था झाली आहे. कर्मचार्‍यांना बसण्यासाठी धड खुर्च्या व टेबल उपलब्ध नाहीत. तसेच कार्यालयात कामानिमित्त येणार्‍या सामान्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहापासून ते अन्य मूलभूत सुविधांची वानवा आहे. अशा वेळी तहसीलदारांच्या केबिनवर मात्र राजरोसपणे हजारोंची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळे नूतन दालनासोबतच तहसीलदार बहिरम यांनी कार्यालयाच्या कामकाजातही सुलभता आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महसील कार्यालय www.pudhari.news
महसील कार्यालय www.pudhari.news

अन् जनता अवाक्
शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्यभरातील ठेकेदारांचे 2200 कोटींची बिले मध्यंतरीच्या काळात रखडली. त्यामुळे ठेकेदारांनी बिलांसाठी विविध मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला. अशा परिस्थितीत तहसील कार्यालयाच्या नूतनीकरणावर मोठी उधळपट्टी केली जात असल्याने सामान्य जनताही अवाक झाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘नाशिक तहसील’च्या नूतनीकरणाचा घाट appeared first on पुढारी.