नाशिक परिक्षेत्रात ५५९ मद्यपी चालकांवर कारवाई

मद्यपी चालकांवर कारवाई,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३० व ३१ डिसेंबरला ३७२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्यात ५५९ मद्यपी वाहनचालक आढळून आले आहेत.

नववर्षाचे स्वागत करताना अनेक अतिउत्साही नागरिक मद्यसेवन करून वाहन चालवतात. त्यांच्याकडून अपघात होऊन स्वत:सह इतरांच्या जिवाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीणसह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथे ३७२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. त्यात ११ हजार ७६१ वाहनांची तपासणी केली असता ५५९ चालक मद्यपी आढळले. तर ९८० चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. संबंधितांकडून पाच लाख २६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत सर्वाधिक १६४ मद्यपी चालक जळगावमध्ये आढळले. त्याखालोखाल नगर (१५५), धुळे (१०३), नंदुरबार (९३) व नाशिक ग्रामीणच्या हद्दीत ४४ मद्यपी चालक आढळून आले.

कारवाईत सातत्य राहणार

नाशिक परिक्षेत्रात दोन दिवस नाकाबंदी करून वाहन तपासणी करण्यात आली. त्यात मद्यपी चालकांसह बेशिस्त चालकांवर कारवाई केली आहे. यापुढेही ही मोहीम अचानक राबविण्यात येईल. – डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

हेही वाचा :

The post नाशिक परिक्षेत्रात ५५९ मद्यपी चालकांवर कारवाई appeared first on पुढारी.