आरटीओकडून कारवाईनंतरही खासगी वाहनचालकांचा बेशिस्तपणा ‘जैसे थे’

Four Wheeler pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाहतूक नियमांचे पालन न करता खासगी ट्रॅव्हल्स चालक सुसाट प्रवासी वाहतूक करत असल्याचे चित्र आहे. त्यात अनेक खासगी ट्रॅव्हल्स बसचालक वाहतूक नियमांचे पालन न करता प्रवासी वाहतूक करतात. त्यामुळे प्रवाशांसह चालकांचाही जीव धोक्यात राहत आहे. यंत्रणांकडून वारंवार कारवाई करूनही त्यात सुधारणा होत नसल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे.

शहरातील मिरची हॉटेल चौक परिसरात ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातात खासगी ट्रॅव्हल्स बसमधील १२ प्रवाशांचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघाताने खासगी ट्रॅव्हल्स बसचालकांचा बेशिस्तपणा पुन्हा चव्हाट्यावर आला होता. घटनेनंतर काही दिवस यंत्रणांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा तेच चित्र पाहावयास मिळत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहने चालवण्यासोबत वाहनांची योग्य देखभाल न केल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार होत असल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने गत दोन वर्षांत ६ हजारांहून अधिक बेशिस्त ट्रॅव्हल्स चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, तरीदेखील बेशिस्तपणा कमी होत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनांची नोंद
चारचाकी व्यावसायिक वाहने – ५,४३८
ट्रॅव्हल्स बस – ६,४८७

कायम तपासणी सुरू
समृद्धी महामार्गासह इतर मार्गांवर २४ तास वाहनांची खासगी ट्रॅ्व्हल्स बस व व्यावसायिक वाहनांची तपासणी करण्यात येते. मद्यपी चालकांचाही शोध घेतला जातो. कार्यालयाकडील ३ वायुवेग पथकांमार्फत नियमित तपासणी सुरू असते. – प्रदीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन विभाग.

६ हजार ८१७ वाहनांमध्ये दोष
जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभागाने ११ हजार ७३१ ट्रॅव्हल्स वाहने तपासली. त्यापैकी ६ हजार ८१७ वाहनांमध्ये दोष आढळून आला. त्यात कागदपत्रे नसणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, जादा प्रवासी वाहतूक, वाहनांच्या मूळ रचनेत बदल असणे, वाहनांची देखभाल नसणे आदी प्रकरणांमध्ये वाहनचालक दोषी आढळून आले. त्यांना १९६.७४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

या नियमांकडे दुर्लक्ष
– प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसच्या दर्शनी भागात बसचालकाचा फोटो, मोबाइल क्रमांक, बस कंपनीचा कार्यालय दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातील माहिती स्टिकर स्वरूपात लावणे आवश्यक असते. मात्र, ती माहिती दिसत नाही.
– प्रवासादरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे, याबाबत सूचनाही प्रवाशांना देणे आवश्यक असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जाते.
– रातराणी गाड्यांमध्ये प्रवासी झोपेत असताना ट्रॅव्हल्स बसचालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याचा आरोप, तसेच वाहने चालवताना भ्रमणध्वनीचा वापर होत असतो.
– प्रवासात जादा प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामुळे प्रवाशांची ओळख राहत नाही. त्याचप्रमाणे अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त सामानाची वाहतूक केली जात असल्याचा आरोप हाेतो.

हेही वाचा:

The post आरटीओकडून कारवाईनंतरही खासगी वाहनचालकांचा बेशिस्तपणा 'जैसे थे' appeared first on पुढारी.