जिल्ह्यातील बाजार समित्या आठवड्यापासून बंद

कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हमाल-मापारी संघटनेच्या लेव्हीबाबत असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १०-१२ दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. याला मार्चअखेर, शासकीय सुट्या तसेच व्यापाऱ्यांचा आर्थिक ताळेबंद अशीदेखील कारणे आहेत. त्यामुळे जवळपास सव्वाशे कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचे समोर आले आहे.

शेतकऱ्यांनी शेतमाल विकल्यानंतर त्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली व तोलाईपोटी दोन टक्के रक्कम कापली जाते. या रकमेचा वापर हमाल आणि मापाऱ्यांसाठी माथाडी मंडळात आडत्यांमार्फत भरली जाते. माथाडी मंडळ पगाराच्या रूपाने ती माथाडींना (हमाल-मापारी तोलाईदार आदी) अदा करते. मात्र, अनेक वर्षांपासून ही रक्कम जमा झालेली नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यानंतर लेव्हीची ३४ टक्के रक्कम व्यापारी व आडते यांनी जमा करण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. तशा नोटिसाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते पैसे चुकते करणे व्यापाऱ्यांना भाग आहे. मात्र, आडते व व्यापाऱ्यांचा प्रत्यक्ष मालक म्हणून मापारींशी संबंध नसून, त्यांची जबाबदारी नियमानुसार बाजार समितीची असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मार्चअखेरनंतर लेव्हीचा मुद्दा चिघळल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातच अनेक शेतक-यांकडे चाळी नसल्याने कांदा शेतातच पडून आहे. मजुरी देण्यासाठी शेतक-यांकडे पैसे नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाजारसमित्या तीन दिवसांहून अधिक दिवस बंद ठेवू नये, असे आदेश पणन संचालक सोनी यांनी दिले. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम शेतकरीविरोधी घटक करीत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.

आता काही भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतात शेतक-यांचा कांदा भिजला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? ज्या शेतक-यांना कांदो विक्रीची गरज आहे. त्यांना बाजार समित्या बंदमुळे नाहक त्रास होत आहे. – भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

शेतकरी अडचणीत
कांदाविक्री होत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सध्या उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू आहे. काही शेतकऱ्यांचा रब्बीचा कांदाही काढून शेतात उघड्यावर आहे. मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांची दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था झाली आहे. शासनाने यामध्ये लक्ष घालत कांदा मार्केट तातडीने सुरू करावे, अशी मागणी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

हेही वाचा:

The post जिल्ह्यातील बाजार समित्या आठवड्यापासून बंद appeared first on पुढारी.