नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

ड्रग्जविरुद्धची लढाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये सन २०२३ मध्ये आठ कोटी १७ लाख रुपयांचा गांजा, तर सुमारे सतरा लाख रुपये किंमतीचा अफू जप्त केला आहे. त्यामुळे अंमली पदार्थाची पाळेमुळे ग्रामीण भागातही घट्ट असल्याचे कारवाईतून उघड झाले आहे. त्याचप्रमाणे नशेच्या दीड लाख रुपयांच्या गोळ्या जप्त करीत अडीच लाखांचे मेफेड्रॉन (एमडी) हस्तगत केले आहे. वर्षभरात पाच जिल्ह्यांतून सुमारे सव्वा आठ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करुन ४५८ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत वाढ केली आहे. यासह अवैध हत्यारे, घातक शस्त्रे वापरणाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले आहेत. गावपातळीपर्यंत पोहोचून अंमली पदार्थांचा वापर, विक्री आणि खरेदीवर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी प्रयत्न केले. त्यानुसार गत वर्षभरात नाशिक ग्रामीणसह धुळे, नंदुरबार, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यात नियमीत कारवाई केली. संशयितांसह सराईतांवर पाळत ठेवण्यासह अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांनाही परावृत्त करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी प्रयत्न केले.

कारवाईत वाढ

सन २०२२ मध्ये नाशिक परिक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधात २२ गुन्हे दाखल करीत १९० संशयितांपैकी १०२ संशयितांना अटक केली होती. तर गत वर्षभरात ३३९ गुन्हे दाखल करून ४५८ संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून पोलिसांनी ८ कोटी ३९ लाख ९६ हजार ६३८ रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

नंदुरबार जिल्हा नशामुक्त

नाशिक परिक्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवली जाते. त्यासाठी गुन्हेगारांवर कारवाई करण्यासोबतच शैक्षणिक संस्थांसह परिसरांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांशीही संवाद घडवून जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. कंपनी, गोदामांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे. यामुळे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेस यश मिळत आहे. तसेच नंदुरबार जिल्हा नशामुक्त घोषित केला आहे.- डॉ. बी. जी. शेखर पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक.

हेही वाचा

The post नाशिक परिक्षेत्रात ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त appeared first on पुढारी.