नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत

police vasahat www.pudhari.news

नाशिक (सिडको) : राजेंद्र शेळके
पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1998 मध्ये पाथर्डी फाटा येथे पोलिस वसाहत उभारली आहे. पोलिस वसाहत स्थापनेपासून म्हणजेच 25 वर्षांपासून या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

पोलिस वसाहतीत एकूण 12 इमारती आहेत. यात दोन इमारती अधिकार्‍यांसाठी आहे, तर 10 इमारती पोलिस कर्मचार्‍यांसाठी आहेत. या वसाहतीत एकूण 288 सदनिका आहेत. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना घरभाडे मिळत असल्याने काही सदनिका सोडून गेल्याने 40 टक्के सदनिका खाली आहेत. पोलिस अधिकारी व कर्मचारी घरातून गेल्यावर पोलिस ठाणे येथे काम लागल्यावर येण्याची वेळ अनिश्चित असते. तर त्यांचा निवासस्थान इमारतीला अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. पोलिस वसाहत 1998 मध्ये उभारल्यानंतर प्रथमच अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले. या भागातील रस्ते डांबरीकरण करून मिळण्यासाठी 25 वर्षांपासून मनपा तसेच इतर विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लहान मुले सायकल चालविताना जखमी झाले आहेत, तसेच महिला व वृद्धांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. तर पोलिस वसाहतीतील अंतर्गत रस्ते पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण झाले पाहिजे, अशी मागणी परिसरातील महिलावर्गाने केली आहे. अधिकार्‍यांसाठी असलेल्या इमारतींमध्ये अंतर्गत विद्युत फिटिंग चांगल्या दर्जाची आहे. परंतु कर्मचार्‍यांसाठी असलेल्या दहा इमारतीत तर वीजवायर भिंतीवर लटकलेल्या आहेत. लहान मुलांचा या वायरला स्पर्श होऊन मोठी दुर्घटना घडू शकते. येथे काही महिन्यांपूर्वी एका इमारतीतील वीजमीटर रूममधील वायरमध्ये शॉर्टसर्किट होऊन वीजमीटर जळाले होते. सुमारे 15 दिवस या इमारतीत अंधार होता. तसेच इमारतीत नवीन पद्धतीच्या फरशा बसविल्या असल्या तरी काही इमारतीत जुन्या पद्धतीच्या फरशा बसविलेल्या आहेत. राहिलेल्या उर्वरित इमारतीत नवीन पद्धतीने फरशा बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. उद्यान असून खेळणी नाहीच वसाहतीत लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान उभारले आहेत. या उद्यानात खेळणी आहे. परंतु उद्यानात खेळण्यांचे प्रकार कमी आहेत. नवीन अत्याधुनिक पद्धतीचे खेळणी बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. वसाहत प्रवेशद्वारालगत कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. मनपा आरोग्य विभागाने प्रवेशद्वारालगत साचलेला कचरा उचलला पाहिजे.

पोलीस वसाहत www.pudhari.news

वसाहतीच्या प्रवेशद्वारावरील फलक गायब
पोलिस वसाहतीसाठी भव्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर नाव टाकल्यास वसाहतीची ओळख होऊ शकते. पोलिस कर्मचारी हे मागण्यांसाठी आंदोलन करू शकत नाही, परंतु त्यांच्या निवासस्थानी सुविधा मिळाल्या पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.