नाशिक बनतेय ‘लेपर्ड कॅपिटल’

गंगापूर रोड : आनंद बोरा

देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल नुकताच सरकारने प्रसिद्ध केला असून, महाराष्ट्रात तब्बल 1,985 बिबट्यांची नोंद झाली आहे. त्यात पुणे आणि नाशिक भागात सर्वाधिक बिबटे असल्याचेही म्हटले आहे. नाशिकमध्ये स्वतंत्र बिबट्याची गणना झालेली नसली, तरी जिल्ह्यात बिबट्याची संख्या वाढत असल्याचे वनअधिकाऱ्यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, देवळाली कॅन्टोन्मेंटचा किनारी भाग, निफाड आणि दिंडोरी या परिसरात बिबटे आढळत आहेत. दारणा पट्ट्यामध्ये सर्वाधिक बिबटे असल्याने महाराष्ट्रातील ‘लेपर्ड कॅपिटल’ म्हणून आता नाशिककडे बघितले जात आहे.

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बिबट्यांची संख्या किमान 500 च्या जवळपास असण्याची शक्यता आहे. जी तीन वर्षांपूर्वी सुमारे 250च्या आसपास होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसाचे मळे असून, ते बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास आहे. ऊस तोडणीदरम्यान बिबट्याचे पिलू आढळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत वनविभागाने केलेल्या विविध प्रयत्नांमुळे 2020-21 मध्ये झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत बिबट्याच्या जलद बचाव कार्यामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यांच्या संख्येत घट झाली आहे. नागरिकांमध्ये सातत्याने जनजागृती केली जात असून, गावात एकटे घराबाहेर जाणे टाळावे आणि रात्रीचे दरवाजे बंद करावे अशा सूचना दिल्या जात असून, बहुतेक गावकऱ्यांच्या घरी शौचालये असल्याने उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाणही कमी झाले असल्याने संघर्ष कमी होत आहे.

तीन वर्षांत संख्या दुप्पट

  • जिल्ह्यात बिबट्यांची नेमकी संख्या किती आहे, हे सांगणे कठीण आहे.
  • तरी नाशिक महापालिकेच्या हद्दीपासून 5 किमी परिघात सुमारे 100 बिबटे असू शकतात.
  • तीन वर्षांपूर्वी ही संख्या केवळ 50 होती.
  • म्हणजे महापालिका हद्दीपासून पाच किमी परिघात बिबट्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

गेल्या तीन वर्षांत तब्बल 83 बिबट्यांचा मृत्यू झाला असून, या मध्ये 30 टक्के मृत्यू हे अपघातात झाले असल्याचे समोर आले आहे, तर 60 टक्के नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाले असल्याचे वनअधिकारी सांगतात. जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानवी वस्तीतून सुटका करण्यात आलेल्या बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याने या प्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे वनअधिकाऱ्यांचे मत आहे.

अशी झाली बिबट्यांच्या संख्येत वाढ

राज्य           2018           2022           2024 [अंदाजे]

मध्य प्रदेश     3421             3907               3980

महाराष्ट्र         1,690             1985              2000

कर्नाटक        1,783            1879               1900

तमिळनाडू      868             1,070               1150

गेल्या दोन वर्षांत बिबट्यांची संख्या वाढली असून, विविध ठिकाणी 50 ट्रॅप कॅमेरे लावून त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. शहर, परिसरात बिबट्याची गणना करणे अवघड असले, तरी त्यांची संख्या दोन वर्षांच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी आम्ही जनजागृती करण्यावर भर देत आहोत. – अनिल अहिरराव, वनपरिमंडळ अधिकारी, पश्चिम विभाग

नाशिकमध्ये बिबट्या किंवा कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास त्याच्या उपचारासाठी म्हसरूळ परिसरात ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यात आले असून, पुण्याच्या रेस्क्यू संस्थेला हे काम देण्यात आले आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम आता नाशिकमध्ये सुरू झाले आहे.

– वैभव भोगले, वाइल्ड लाइफ मॅनेजमेंट, रेक्यू टीम.

——-

हेही वाचा-