
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येवर झालेला परिणाम, वन्यप्राण्यांच्या संख्येतील घट अथवा वाढ, नवीन दाखल झालेले प्राणी आदींची माहिती जाणून घेण्यासाठी दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यप्राणी गणना केली जाते. शुक्रवारी (दि. ५) नाशिक वनवृत्तातील अभयारण्यासह राखीव वनक्षेत्रात प्रगणना पार पडणार आहे. रात्री बारा ते दुसर्या दिवशी अर्थात शनिवारी (दि. ६) रात्री बारापर्यंत ही गणना होणार आहे.
बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री लख्ख प्रकाशात अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात वन्यप्राण्याची गणना करणे सोपे असते. त्या पार्श्वभूमीवर नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वरसह ममदापूर-राजापूर, कळसूबाई-हरिश्चंद्रगढ, भंडारदरा, राजूर, यावल, आनेर, पाल आणि जामन्या या अभयारण्यात प्रगणना केली जाणार आहे. वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणिप्रेमी रात्रभर पाणवठ्यावर बसून प्राण्यांच्या हालचालींची निरीक्षण करणार आहे. सोबतच पाणी पिण्यासाठी येणार्या प्राण्यांची माहिती नोंदविणार आहेत. वन्यप्राणी निरीक्षणासाठी पाणवठ्याजवळ मचाण उभारण्यात आल्या आहेत.
दरम्यान, वन्यजीव रात्रीतून पाणवठ्यांजवळ किंवा निरीक्षण मनोरे अथवा मचाणाजवळून मार्गस्थ होत असल्याने त्यांची नोंद घेणे शक्य होते. पूर्वी प्राण्याची विष्ठा तसेच ठशांचा अभ्यास करून वन्यप्राण्यांची गणना केली जात होती. आता पारंपरिक पद्धतीसोबतच कॅमेरा ट्रॅपिंग आणि ट्रान्झॅक्ट मेथडचा वापर केला जात आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने वनक्षेत्रातील प्राण्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
वन्यप्राणी गणनेची तयारी पूर्ण झाली असून, पाणवठ्यांजवळ मचाण उभारण्यात आल्या आहेत. या प्रगणनेविषयी वन्यजीवप्रेमींमध्ये मोठे आकर्षण असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक-विद्यार्थ्यांना प्रगणनेत सामावून घेतले जाणार आहे.
– अमोल आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा
हेही वाचा :
- नगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेचा अधिकारी सतरा हजाराची लाच घेताना ताब्यात
- नगर जिल्ह्यातील ‘त्या’ 22 वाड्यांसाठी सहा टँकर !
- Karnataka Election 2023 : भाजपचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी अजिबात संबंध नव्हता; राऊतांचा भाजपवर निशाणा
The post नाशिक : बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री होणार वन्यप्राणी प्रगणना appeared first on पुढारी.