नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण 

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महानगरपालिकेच्या वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांची बहुप्रतीक्षित भरतीप्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. गेल्या पंधरवड्यातच ही भरतीप्रक्रिया सुरू होणे अपेक्षित असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा, त्यापाठोपाठ शहरात सुरू करण्यात आलेली स्वच्छता मोहीम आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे ही भरतीप्रक्रिया लांबणीवर पडली आहे. त्यातच येत्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने या निवडणुकीनंतरच या नोकरभरतीला मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेच्या ७,०९२ पदांच्या आस्थापना परिशिष्टाला शासनाने मंजुरी दिली होती. ‘क’ संवर्गातील नाशिक महापालिकेची ‘ब’ संवर्गात पदोन्नती झाली. त्यानुसार कर्मचारी संख्याही वाढणे अपेक्षित असताना दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. जेमतेम ४१०० कर्मचाऱ्यांच्या भरवश्यावर महापालिकेच्या कामकाजाचा गाडा हाकला जात आहे. त्यातही १७५० पदे ही सफाई कर्मचाऱ्यांची आहेत. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून सुधारित आकृतिबंध शासनाला सादर करण्याची तयारी केली जात आहे. मात्र आकृतिबंधाचे सादरीकरण व त्यास शासनाची मंजुरी या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. कोरोना काळात तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यातील डॉक्टरांची ८२ पदे वगळता उर्वरित पद भरतीसाठी महापालिकेने शासनाच्या निर्देशांनुसार टीसीएस कंपनीची निवड केली आहे.

इच्छुकांच्या पदरी निराशा

नोकरभरती प्रक्रिया लांबल्याने या भरतीप्रक्रियेकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुक उमेदवारांची मात्र घोर निराशा होणार आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदी यांचा दौरा झाला. त्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून शहरात ‘डीप क्लीन’ स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. पाठोपाठ मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेवर आली. त्यात नोकरभरतीची तयारी मागे पडली. आता आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता काळात नोकरभरतीची प्रक्रिया राबविता येत नाही. तेव्हा निवडणुकीनंतरच ही प्रक्रिया राबविता येईल. पाठोपाठ विधानसभा निवडणूकदेखील नोकरभरतीला अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

The post नाशिक मनपाची नोकरभरती लांबणीवर, हे आहे कारण  appeared first on पुढारी.