नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली

फायर ऑडिट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या लोकसंख्येनुसार पुरेशा अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी शहरात किमान २१ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता असताना आजमितीस जेमतेम सहा केंद्र कार्यरत असून, मनुष्यबळाअभावी अग्निशमन विभागाची यंत्रणा मोडकळीस आली आहे. अवघे १८ फायरमन आणि ६० लीडिंग फायरमनच्या भरवशावर २५९ चौ. किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या नाशिक शहराच्या अग्निशमन विभागाचा कारभार सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तसेच नोकरभरतीअभावी तीन नवीन अग्निशमन केंद्रांचा प्रस्तावही रखडला आहे.

शहरातील आपत्ती निवारणासाठी अग्निशमन विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात पूरपरिस्थिती असो वा आग, भूकंपासारख्या नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी महापालिकेच्या अग्निशमन विभागाची भूमिका महत्त्वाची असते. नियमांनुसार एक लाख लोकसंख्येमागे एक किंवा १० चौरस किमी मागे एक अग्निशमन केंद्र असायला हवे. लोकसंख्येनुसार विचार केल्यास किमान १४ तर क्षेत्रफळानुसार किमान २१ अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत जेमतेम सहा अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या सहा अग्निशमन केंद्रांसाठीदेखील उपलब्ध मनुष्यबळ पुरेसे नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नव्याने गांधीनगर, गंगापूर रोडवरील होरायझन अकॅडमी समोर तसेच जेलरोड ते दसक पंचकदरम्यान अशा तीन ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र प्रस्तावित केले होते. यासाठी नोकरभरतीचा प्रस्तावही अग्निशमन विभागाने राज्य शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र नोकरभरतीची प्रक्रिया रखडली. या नोकरभरतीसाठी राज्य शासनाने दिलेल्या एका वर्षाची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपुष्टात आली. यामुळे नोकरभरतीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे नवीन अग्निशमन केंद्रांची उभारणीदेखील अडचणीत आली आहे.

अघटित घडण्याचा धोका
महपालिकेच्या अग्निशमन विभागाचे शहरात सिडको, सातपूर, नाशिक रोड, पंचवटी अमृतधाम व मखमलाबाद नाका तसेच मुख्यालय शिंगाडा तलाव असे एकूण सहा केंद्र आहेत. या विभागासाठी २९९ इतके फायरमन मंजूर आहेत. मात्र आजमितीस केवळ १८ फायरमन असून, पदोन्नतीमुळे लीडिंग फायरमनची संख्या ६० वर गेली आहे. यामुळे इतक्या अल्प मनुष्यबळात या विभागाचा कारभार सुरू असून, मोठी दुर्घटना वा नैसर्गिक आपत्ती घडल्यास अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर ती नियंत्रणात कशी आणता येईल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मनुष्यबळाअभावी तीन अग्निशमन केंद्रांचे प्रस्ताव स्थगित करण्यात आले आहेत. नोकरभरतीनंतर या तीन केंद्रांचे प्रस्ताव पुन्हा आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर केले जातील. – संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा.

The post नाशिक महापालिकेची तीन प्रस्तावित अग्निशमन केंद्रे रखडली appeared first on पुढारी.