नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक लोकसभा मतदारासंघावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू असताना, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या जागेवर दावा करत खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार हे अजित पवार गटाचे असल्याचा दावा करत नाशिकच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपलाही दावा कायम असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. महायुतीच्या नेत्यांमधील चर्चेनंतर उमेदवार निश्चिती होईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी भवन येथे भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवार गटाची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, नाशिकवर आपल्या पक्षाचाही दावा आहे. कुठली जागा कुणाला मिळेल, ते लवकरच कळेल. पण महायुतीतील कुठल्याही पक्षाला संधी मिळाली, तरी त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहावे. चालू वर्ष हे निवडणुकांचे असून त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. पक्षाचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावे. लोकांमध्ये जनजागृती करून त्यांना आपलेसे करण्याचे प्रयत्न पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी करावेत. विविध उपक्रम राबवून लोकांशी संपर्कात राहून घराघरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून एकत्रित येऊन जिल्हाभर काम करावे. शहरासोबतच ग्रामीण भागातही अधिक लक्ष देऊन काम करावे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण विकासाची अनेक कामे करत आहोत. ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावी. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील विविध भागांत तसेच ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या शहरात संपर्क कार्यालये निर्माण करावी, अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या.
रविवारी मनोमिलन बैठक
भुजबळ म्हणाले की, राज्यात महायुती म्हणून आपण काम करत आहोत. त्यादृष्टीने रविवारी (दि. १४) मनोमिलन बैठकांचे आयोजन होणार आहे. या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. ज्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. त्यांनी लवकरात लवकर कार्यकारिणी तयार करून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
अजित पवार गटाला धोका नाही
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेविषयी दिलेल्या निकालाचे स्वागत करत, अजित पवार गटाला कुठलाही धोका नसल्याचा दावा भुजबळ यांनी केला. हा निकाल कायद्याच्या कसोटीवर लागल्याचे नमूद करत अजित पवार गटाबाबत कुठलाही संभ्रम नाही. आपला पूर्वीचाच व्हीप असल्याने आपली बाजू भक्कम आहे, असेही भुजबळ म्हणाले. कांद्याच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
- सकलजनवादी राजमाता जिजाऊ
- National Youth Festival : कुंभनगरीत युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार
- मोहोळवरील हल्ला फसल्यानंतर आरोपींची वकिलांसोबत बैठक
The post नाशिक लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचाही दावा appeared first on पुढारी.