नाशिक लोकसभा मतदारसंघ : …म्हणून वाजेच ठरले ‘राजे’!

नाशिक: आसिफ सय्यद

ॲन्टीइन्कम्बन्सीचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट दिसत असतानाही केवळ हेमंत गोडसे यांच्या हट्टाग्रहापोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावल्याने महायुतीला भाकरी फिरवण्यात आलेले अपयश, छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेला ओबीसी समाज, मराठा आरक्षणविषयक भूमिकेमुळे महायुतीपासून दुरावलेला मराठा समाज, जागावाटपातील मतभिन्नतेमुळे उद‌्भवलेल्या संघर्षात उमेदवारी जाहीर करण्यात झालेला कमालीचा विलंब आणि एकगठ्ठा मतांच्या रूपाने अल्पसंख्याक समाजाने महाविकास आघाडीला दिलेली साथ यामुळेच महायुतीला नाशिकची जागा गमवावी लागली आहे. सलग दोन वेळा खासदार राहिलेल्या गोडसे यांचा पराभव करत महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी आपणच नाशिकचे ‘राजे’ असल्याचे दाखवून दिले असून, असली-नकली शिवसेनेतील भेदही या निवडणुकीच्या निकालाने नाशिककरांनी समोर आणल्याने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा निकाल महायुतीसाठी धोक्याची घंटा ठरला आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वरकरणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दिसत असली तरी ती प्रत्यक्षात शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या गटातील संघर्षांचा फैसला करणारी राजकीय रणभूमीच होती. या निवडणूक निकालातून नाशिकमध्ये ‘आवाज’ कुणाचा हे ठाकरे गटाने दाखवून दिले आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाशिकवर अतुट प्रेम होते. नाशिककरांनीही वेळोवेळी या प्रेमाला प्रतिसाद देत नाशिक हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले होते. भाजपच्या इशाऱ्याने झालेली बाळासाहेबांच्या शिवसेनेची झालेली ‘मोडतोड’ नाशिककरांना रूचलेली नव्हती. त्यामुळेच सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्यानंतर नाशिककरांनीच ही निवडणूक हाती घेतली. तब्बल १ लाख ६२ हजार मतांच्या फरकांनी विजयी करत नाशिककरांनी वाजे यांना लोकसभेत पाठविले. नाशिकच्या रिंगणातील प्रमुख चारही उमेदवार मराठा समाजाचे असल्याने मराठा समाजाच्या मतांची मोठ बांधण्यात महायुतीला यश मिळू शकले नाही. नाही म्हणायला जरांगे फॅक्टरही त्यासाठी कारणीभूत ठरलाच. ओबीसी समाजाची ओढावून घेतलेली नाराजी हेही महायुतीच्या अपयशाचे कारण ठरले. राज्यातील ओबीसींचे नेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांची नाशिकमधील उमेदवारी थेट दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी निश्चित केली होती. मात्र त्यानंतरही महायुतीतील उमेदवारी निश्चितीचा घोळ कायम राहिल्याने अखेर भुजबळांना निवडणूक रिंगणातून माघार घ्यावी लागली. यामुळे दुखावलेला ओबीसी समाज महायुतीविरोधात गेला नसता तर नवलच! अल्पसंख्याक समाजाने बजावेली भूमिकाही यंदाच्या निवडणूक निकालावर मोठा परिणाम करणारी ठरली. एकगठ्ठा मतांच्या रुपाने मुस्लिम समाज वाजेंच्या किंबहुना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे गोडसे यांच्या विजयाची शक्यता पुरती मावळली.

सिन्नरकरांनी जपली अस्मिता, इगतपुरीतूनही वाजेंना साथ

वाजे यांच्या रूपाने स्थानिक भूमिपूत्राला दिल्लीत पाठविण्यासाठी सिन्नरकरांनी बजावलेली भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरली. २०१९ च्या निवडणुकीत ॲड. माणिकराव कोकाटे यांना सिन्नरकरांची जी साथ मिळू शकली नाही ती मिळविण्यात यंदा वाजे यशस्वी ठरले. सिन्नर विधानसभा मतदारसंघातून वाजे यांना सर्वाधिक १ लाख ५९,४९२ मते मिळाली. त्या तुलेनत गोडसे यांना जेमतेम ३१,२५४ मते मिळू शकली. तब्बल १ लाख २८ हजार २३८ मतांचा लीड देत सिन्नरकरांनी वाजे यांच्या विजयाचा पाया रचला. तर, इगतपुरी विधानसभा मतदारसंघानेही तब्बल ४३,५३३ मतांची आघाडी देत वाजे यांच्या विजयाचा कळस चढविला. २०१९च्या निवडणुकीत गोडसे यांना ईगतपुरीतून तब्बल ६८,९७० मते मिळाली होती. यावेळी ५८,०५२ मतांवरच त्यांना समाधान मानावे लागले. त्यातुलनेत वाजे यांनी दुप्पट अर्थात १ लाख १,५५८ मते मिळवली.

मध्य, देवळालीला गृहीत धरणे भोवले

२०१९च्या निवडणुकीत गोडसे यांना नाशिक मध्य मतदारसंघातून ९४,४२९ तर देवळाली विधानसभा मतदारसंघातून ८०,६८८ मतं मिळाली होती. देवळाली होमग्राऊंड असल्याने नातेसंबंधांचा फायदा होईलच, अशी गोडसेंना आशा होती. परंतू नाशिक मध्य आणि देवळाली या दोन्ही मतदारसंघातील मतदारांना गृहीत धरण्याची चूक गोडसेंना नडली. नाशिक मध्यमधून अल्पसंख्याक समाज वाजेंच्या पाठीशी उभा राहिला. गोडसे यांना मताधिक्क्य मिळवून देण्यात भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदें या अपयशी ठरल्या. त्यामुळे गत निवडणुकीत आघाडी देणाऱ्या मध्य मतदारसंघातून गोडसे यांना यंदा ३,८०६ मतांची पिछाडी सहन करावी लागली. या मतदारसंघातून गोडसेंना ८४,९०६ मतं मिळाली तर वाजेंना ८८,७१२ मतं मिळाली. देवळाली मतदारसंघात गोडसेंना ५४,०६४ मते मिळू शकली तर वाजे यांना मात्र ८१,२०० मते मिळाली. देवळालीतून वाजे यांना २७,१३६ मतांची आघाडी मिळाली. विजय करंजकर यांचा शिंदे गटातील प्रवेश, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदार सरोज अहिरे यांचा प्रभाव गोडसेंच्या फारसा कामी येऊ शकला नाही.

नाशिक पूर्व, पश्चिमची आघाडी तोकडीच

भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यामुळे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात गोडसेंना १०,४०० मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघातील गुजराथी, ब्राम्हण समाजाची गोडसेंना साथ लाभली खरी, मात्र मराठा समाजातील मतदारांच्या नाराजीमुळे यंदा मताधिक्य घटले. गोडसेंना १ लाख ३११ मते मिळाली. त्यातुलनेत वाजेंना ८९,९११ मते मिळू शकली. नाशिक पश्चिम मतदारसंघ गत निवडणुकीत गोडसेंच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. या मतदारसंघातून गोडसेंना तब्बल १ लाख ३,८२३ मतांची आघाडी मिळाली होती. यंदा मात्र चित्र वेगळे होते. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी वाजे यांच्या विजयाची धुरा खांद्यावर घेतल्याने गोडसे यांचे मताधिक्क्य ३१,२१० वर घसरले. त्यामुळे वाजे यांच्या विजयाचा मार्ग सुकर बनला. या मतदारसंघातून गोडसे यांना सर्वाधिक १ लाख २४,८२७ मते मिळाली तर वाजे यांनी ९३,६१७ मतांपर्यंत मजल मारली. भाजप आमदार सीमा हिरे यांची गोडसे यांना साथ लाभली असली तरी उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या दिनकर पाटील यांच्या समर्थकांनी पर्याय शोधल्याने गोडसे यांना अपेक्षित मताधिक्क्य मिळू शकले नाही.

हेही वाचा: