नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खल सुरू असताना, नाशिकच्या जागेवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा ठोकला आहे. पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जागेसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे राज्यस्तरावर मविआचे प्रमुख नेते एकसंध आघाडीचा कितीही दावा करत असले, तरी स्थानिकस्तरावर सारेच काही आलबेल असल्याचा प्रत्यय येत आहे. (Nashik Lok Sabha Elections)
लोकसभेची निवडणूक अवघ्या एक ते दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांवर सर्वच राजकीय पक्षांकडून दावा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ तारखेच्या नाशिक दाैऱ्यातून भाजपने मतदारसंघावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २२ तारखेला उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन घेतले. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. परिणामी राज्यासह देशात सध्या नाशिक चर्चेत आले आहे. अशा परिस्थितीत नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आता आक्रमक बाणा अंगीकारला आहे.
शरद पवार गटाची जिल्हास्तरीय बैठक नुकतीच नाशिकमध्ये पार पडली. बैठकीत पक्षाचे जिल्हा प्रभारी आमदार सुनील भुसारा यांची प्रमुख उपस्थिती होती. याच बैठकीत लोकसभा-विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून चर्चा झाली. त्यामध्ये नाशिक लोकसभेची जागा आघाडीत आपल्याला मिळावी, अशी एकमुखी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. फुटीनंतर योग्यरीतीने पक्षाची बांधणी करताना पदाधिकारी आपापल्या परीने समर्थपणे जबाबदारी पार पाडत असल्याचा दावाच पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रभारींसमोर केला. (Nashik Lok Sabha Elections)
जागेवरून आघाडीत बिघाडी शक्यता (Nashik Lok Sabha Elections)
पदाधिकाऱ्यांमधील आत्मविश्वास बघता आ. भुसारा यांचाही उत्साह दुणावला आहे. परंतु, हे जरी सत्य असले, तरी मविआमध्ये जागा वाटपाचा तिढा मात्र कायम आहे. त्यात मध्यंतरीच्या काळात काँग्रेसने नाशिकच्या जागेसाठी शक्तिप्रदर्शन केले. दुसरीकडे उबाठा गटानेही अधिवेशनाच्या आडून उमेदवाराची घोषणा करत आघाडी घेतली आहे. दोन्ही मित्रपक्ष कामाला लागले असताना, मविआमधील राष्ट्रवादीनेही या जागेवर दावा ठाेकला आहे. त्यामुळे येत्या काळात नाशिकच्या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा
- हृतिक रोशनने War 2 बदद्ल दिली मोठी अपडेट; ज्यु. एनटीआरची होणार एन्ट्री?
- US | अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सापडला मृतदेह
- film 12th Fail फेम विक्रांत मेस्सी ट्रॉफी घेऊन आयपीएस मनोज शर्मांच्या भेटीला
The post नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा appeared first on पुढारी.