नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने त्यावर पर्याय शोधण्यासाठी शहर वाहतूक शाखा पर्याय शोधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील वाहतूक बेटांची अरुंदीकरण केले जात आहे. तसेच वाहतूक रहदारी, गर्दीचे ठिकाण, अतिक्रमण याचीही पाहणी केली जात आहे. तसेच आवश्यकतेनुसार काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी करून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न वाहतूक शाखा करीत आहे. त्यासाठी महापालिका व “न्हाई’च्या मदतीने सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वी शहरातील रस्त्यांचे फेरनियोजन होण्याची शक्यता आहे.
‘टॉमटॉम वाहतूक निर्देशांक २०२३’मध्ये वाहतूक कोंडीत जगभरातील ५५ देशांतील ३८७ शहरांपैकी महाराष्ट्रातील पुणे शहर सातव्या क्रमांकावर आहे. वाहतूक कोंडीची समस्या नाशिक शहरातही भेडसावत आहे. वाढत्या शहरीकरणासोबत वाहनांची संख्याही वाढली. मात्र रस्ते, पार्किंग त्या तुलनेने कमी आहेत. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढत असल्याचे चित्र आहे. आगामी सिंहस्थापूर्वी शहरातील रिंग रोडचे काम होत असून, शहरांतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी व सहायक आयुक्त आनंदा वाघ यांनी चारही पथकांना वाहतूक निरीक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) आणि महापालिका यांच्याशी पोलिसांची चर्चा सुरू आहे. तिन्ही यंत्रणा एकत्रित महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी करीत रस्त्यांच्या फेरनियोजनासंदर्भातील सर्वेक्षण करीत आहेत. त्यात रस्त्यावरील व लगतचे अतिक्रमणे दूर करुन रुंदी वाढविणे, वाहतूक असलेल्या चौकांमध्ये सिग्नल प्रस्तावित करणे, काही भागांत एकेरी वाहतूक मार्ग करून वाहतूक कोंडी फोडणे आदी कार्यवाहीसंदर्भात चाचपणी केली जात आहे.
शहरात सीसीटीव्ही, सिग्नल वाढणार
शहरात फेब्रुवारी अखेरीसपर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ६३० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होणार आहेत. तर काही महिन्यांत आवश्यकतेनुसार २५ नवीन सिग्नल कार्यान्वित होऊ शकतात. शहरातील मुंबई नाका, द्वारका येथील वाहतूक बेटांचा आकार कमी केला आहे. त्याचप्रमाणे इतर वाहतूक बेटांचाही अभ्यास सुरू आहे.
शहरातील वाहतुक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचा महापालिका व “न्हाई’सोबत संवाद सुरू आहे. संयुक्त पाहणी, कार्यवाही केली जात आहे. काही ठिकाणी सिग्नल कार्यान्वित करण्यासह ‘वन-वे’ आणि रस्ते रुंदीकरणासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येतील. – चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा
हेही वाचा :
- शिक्षणमंत्र्यांनी घेतला दहावी-बारावी परीक्षा तयारीचा आढावा
- Nashik News | ओतूर प्रकल्पाला 65 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता
- धुळे : नवप्रविष्ठ पोलीसांनी कर्तव्यासोबत कायद्याचे देखील पालन करावे – जिल्हाधिकारी अभिनव गोयल
The post नाशिक शहरातील वाहतूक कोंडीवर 'एकेरी' पर्यायाची चाचपणी appeared first on पुढारी.