नाशिक : पुढारी वृत्तसेवा- धोकादायक पद्धतीने इमारतीच्या गच्चीवर उभारलेल्या हॉटेल्सचे कल्चर शहरातही रुजत असल्याचे समोर येत आहे. मुंबईत एका रुफ टॉप हॉटेलला आग लागली होती, तसेच पुणे येथील पोर्शे अपघातानंतर रुफ टॉप हॉटेलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातही १४ रुफटॉप हॉटेल असून ते विनापरवानगी सुरु असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. त्यापैकी दोन हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
पुण्यातील पोर्शे अपघातानंतर मद्य सेवन, मद्य खरेदी – वाहतूक व मद्यसेवन परवाना याबाबत कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यातही काही हॉटेल चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचीही बाब समोर आली. त्यामुळे हॉटेल, पब, परमिट रुम हे शासकीय यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. त्यानुसार नाशिकमध्येही पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईस सुरुवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाथर्डी फाटा येथील गारवा व गंगापूर रोडवरील फ्लाईंग माँक या रुफ टॉप हाॅटेलवर कारवाई केली. तसेच द केवज् या हॉटेलमध्ये १८ वर्षीय युवकास मद्य विक्री केली जात असल्याचे उघडकीस आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने या ठिकाणीही कारवाई केली आहे. तसेच एका मद्यविक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी सांगितले.
नियमित तपासणी
परवानाधारक हाॅटेल्स, मद्यविक्रेत्यांना मद्यविक्री करताना २१ वर्षावरील व्यक्तींनाच मद्य देण्याच्या सुचना केल्या आहेत. कायद्यानुसार २१ वर्षावरील व्यक्तींना मद्य खरेदी, वाहतूक करता येते. तसेच माईल्ड बिअर पिण्यासाठी २१ तर स्ट्राँग बिअर व विस्की, रम हे विदेशी-देशी मद्य पिण्यासाठी २५ वयाची अट आहे.- शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.
नियमबाह्य, धोकादायक हॉटेल्सचा प्रश्न ऐरणीवर
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रुफटॉप हॉटेल्सला शासकीय विभागाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवला जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच हॉटेलमध्ये जाण्यासाठी एकच जीना व लिफ्ट असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास हॉटेलमधील नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. नियमबाह्य पद्धतीने काही हॉटेलचालक मद्यविक्री करत असल्याचे किंवा मद्यपींना मद्यसेवनासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याचेही चित्र आहे.
हेही वाचा –