सातवाहन काळातही वृक्षसंवर्धन किती महत्त्वाचे होते, याची प्रचिती देणारे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची नाणी नाशिकचे नाणी संग्राहक आणि अभ्यासक चेतन राजापूरकर यांच्या संग्रही बघावयास मिळतात. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दै. ‘पुढारी’शी बोलताना त्यांनी प्राचीन काळातील नाणी व वृक्ष यांविषयी माहिती दिली. सातवाहनकालीन प्रत्येक नाणे हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम करीत असल्याचे राजापूरकर सांगतात. विशेष म्हणजे नाशिकमधील जुन्या सातवाहन नाण्यांमध्ये प्रत्येक नाण्यावर एक वृक्ष दाखविण्यात आला आहे. त्यातून त्यांनी नाशिकच्या वृक्षांविषयी संदेश देण्याचे काम केले आहे.
राजापूरकर यांच्याकडे अशी हजार दुर्मीळ नाणी असून प्रत्येक नाण्यावर नदी, पक्षी, प्राणी, वृक्ष आहेत. त्यातून सातवाहन काळात पर्यावरणाविषयी जागरूकता दिसून येते. लोकांना झाडांचे महत्त्व समजावे म्हणून नाण्यांवर पर्यावरणीय विविध चिन्हांचा खुबीने वापर केला गेला. दोन हजार वर्षांपूर्वी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व किती होते, हे त्याकाळातील नाण्यांवरून कळते. आज जागतिक पर्यावरण दिन साजरी करताना वृक्षांचे महत्त्व समजावून घेऊन प्रत्येकाने एक देशी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असेदेखील राजापूरकर सांगतात.
रोपे अन् लागवडीसाठी जमीनही दान
पांडवलेणी क्रमांक १० मध्येही राजा नहपान यानेदेखील ब्राह्मणास पाच हजार झाडे दान केल्याचा उल्लेख आढळून येतो. जुन्नरमध्ये मानमोडी डोंगरावर अंबा अंबिका लेण्यातील २६ क्रमांकाच्या चैत्यगृहात चैत्य गवाक्षाच्या डाव्या बाजूला दोन शिलालेखही वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगणारे आहेत. ताड, साल, वड, पिंपळ, करंज, जांभूळ आदी देशी झाडे लावावीत असे सांगून ती लावण्यासाठी जमिनीदेखील दान दिल्या आहेत.
गेल्या २० वर्षांपासून मी नाणे संग्रह करीत असून, दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रत्येक सातवाहन नाण्यावर पर्यावरण संदेश देण्याचे काम केल्याचे मला दिसून आले आहे. नाशिकच्या पांडवलेणीच्या गुफांमध्येही असे संदेश आढळून येतात. या नाण्याकडे बघितल्यावर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजून येते. – चेतन राजापूरकर, नाणी संग्राहक व अभ्यासक, गंगापूर
हेही वाचा: