निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. Loksabha Election 2024

काँग्रेसच्या तिकिटावर सलग दोन वेळा २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयश्री मिळविणाऱ्या निर्मला गावित यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी शिवबंधन बांधत सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी काँग्रेसचे हिरामण खोसकर यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यान, लोकसभा आणि आगामी विधानसभा लक्षात घेता, निर्मला गावित यांची उपनेतेपदी निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सेना ठाकरे गटाने लोकसभेचा आपला उमेदवार यापूर्वीच जाहीर केला असून, नाशिक लाेकसभा मतदारसंघात येणाऱ्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या मागे पाठबळ उभे करण्यासाठी ही निवड महत्त्वपूर्ण समजली जात आहे. काही दिवसांपूर्वीच देवळाली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, उपनेते बबन घोलप यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघाला लागून असलेल्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात हे पद गेल्याने, या भागात पक्षाचे संघटन उभे करण्याची मोठी संधी उबाठा गटाला मिळण्याची शक्यता आहे. निर्मला गावित या ९ वेळा खासदार राहिलेले काँग्रेसचे माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर अतिशय विश्वासाने जबाबदारी सोपवली आहे. या संधीचा उपयोग मी नक्कीच पक्षवाढीसाठी आणि पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी करेन. कदाचित प्रथमच एका आदिवासी महिलेला अशी संधी दिली गेली आहे.

– निर्मला गावित, नवनियुक्त उपनेत्या, ठाकरे गट

हेहीवाचा –

The post निर्मला गावित यांची ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड appeared first on पुढारी.