धुळे : पुढारी वृत्तसेवा;निष्काळजीपणा केल्यामुळे सात वर्षाच्या मुलाचा प्राण गेल्या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर निजामपूर पोलिसांनी सुजलान कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
साक्री तालुक्यातील मौजे राजनगाव येथे सुजलोन ग्लोबल सर्विसेस कंपनी वीज निर्मिती करणाऱ्या टॉवरवर 18 नोव्हेंबर 2020 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. या शिवारात संदीप संजय सूर्यवंशी (वय सात वर्ष) आणि काही मुले हे टॉवर जवळील शेतात खेळत होती. मात्र सुजलोन ग्लोबल सर्विसेस कंपनीच्या टावर क्रमांक के 295 येथील ट्रांसफार्मरचे गेट उघडे होते. त्याचप्रमाणे तेथे कोणताही सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्यामुळे गावातील काही शाळकरी मुले शेतात खेळत असताना गेटमधून आत शिरले. यात संदीप संजय सूर्यवंशी (वय सात ) हा मुलगा ट्रांसफार्मर वर चढला. त्यातील बुशिंगला हात लागल्यामुळे त्याला विजेचा धक्का लागून तो गंभीररित्या भाजून खाली पडला. त्यामुळे त्याला उपचारासाठी शेतात काम करणारे त्याचे आई-वडील आणि अन्य नागरिकांनी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची गंभीर स्थिती पाहता त्याला पुढील उपचारासाठी सुरत येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सुरत येथे उपचारा दरम्यान त्याचा 19 नोव्हेंबर 2020 रोजी मृत्यू झाला. या संदर्भात सूर्यवंशी परिवाराने त्याच वेळी सुजलोन कंपनीच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर अंमलबजावणी न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता सुजलोन कंपनीच्या निष्काळाचीपणामुळे हा मृत्यू झाल्या प्रकरणात विशाल किशोर पिंपळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कंपनीचे सुनील नंदलाल चावला, सुमित मारोतराव बहादेकर, शरम सिंग , तुकाराम सुखदेव जावरे, नितीन कुमार ज्ञानदेव लांडे, ज्ञानेश्वर पंडित पवार यांच्या विरोधात भादवि कलम 304, 120 ब, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Skin Itching : डर्माटिलोमॅनिया, त्वचा खाजवण्याची सवय
- Golden Globe Awards 2024 | गोल्डन ग्लोब २०२४ मध्ये ‘ओपेनहायमर’ची बाजी, वाचा संपूर्ण विजेत्यांची यादी
- इंग्लंड भारतात आणणार स्वत:चा शेफ
The post निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.