
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
दुष्काळी परिस्थिती अन् उन्हाळ्याची चाहूल लागल्याने माणसांसोबत पक्ष्यांचीही पाण्यासाठी अन् धान्यासाठी धावाधाव सुरू होते. हे लक्षात घेत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरदे येथील विद्यार्थ्यांनी ‘पक्षी वाचवा अभियान’ हा नवोपक्रम सुरू केलाय.
उपक्रमशील असलेली उंबरदे ही शाळा सातत्याने नवनवे उपक्रम हे मुख्याध्यापक शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनातून राबवत असते. येथील पर्यावरणवादी असलेली ही मुले पुस्तकातले जग प्रत्यक्षात जगतात. उन्हाळ्याची चाहूल लागली. आपल्या जवळ असलेल्या टाकाऊ डब्यांना योग्य काप देत झाडाच्या पायथ्याशी अन् झाडावर पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली.
येथील मुलांची पक्षी वाचवा अभियान टीम ही प्रत्यक्षात पुढाकार घेत आहे. त्यात संगीता पवार, देवेंद्र वायडे व पालकांचा सहभाग आहे. आपल्या सोबत पाखरांची शाळा ही मुले अनुभवत आहेत. मुलांनी प्लास्टिक डबे, बाटल्या, फुटके माठ, तारा, दोरा, सुतळी या साधनांचा उपयोग केला असून, गावातील पर्यावरणवादी युवकांनीही यासाठी मदत करून पुढाकार घेतला आहे. ठिकठिकाणी पाण्याचे पाणवठे मुलांनी स्वतः श्रमदान करत तयार केले. पक्षी संवर्धन काळाची गरज असून त्यासाठी चिमुकल्यांचा पुढाकार प्रेरणादायी आहे. मुले ‘पक्षी वाचवा अभियान’करिता जागृती करणार आहेत.
दुष्काळी परिस्थिती आणि दाहक उन्हाळा यात उंबरदे येथील विद्यार्थी, पालक व शिक्षक राबवित असलेला ‘पक्षी वाचवा अभियान’ हा उपक्रम पर्यावरणाचे संवर्धन राखण्यास मदत करणार आहे. – एस. ए. निकम, शिक्षण विस्तार अधिकारी
हेही वाचा:
- नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवारीने ‘मनसे’ इच्छुकांची माघार? महायुतीचा पाळावा लागेल धर्म
- हेमंत गोडसे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर शक्तिप्रदर्शन, नाशिकसाठी भुजबळांच्या नावाच्या चर्चेने शिंदे गट आक्रमक
- केजरीवालांना माेठा दिलासा, मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
The post ‘पक्षी वाचवा अभियान’: टाकाऊ डब्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय appeared first on पुढारी.