पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाला सुरुवात

जागतिक कृषी महोत्सव,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शेतीज्ञानाद्वारे शेतकऱ्यांनी आपले नाव भूतलावर सिद्ध केले आहे. आधुनिक काळातील शेतीचे होत चाललेले तुकडे क्लेशदायक आहे. यातून भविष्यकाळ धोक्यात आला असून, माणसाने आता सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Nashik Krushi Mahotsav)

गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अण्णासाहेब मोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, आमदार अनिकेत तटकरे, आ. सीमा हिरे, माजी आ. सुधीर तांबे, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपायुक्त सुनील सौंदाणे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरू संजीव सोनवणे, निवृत्ती लाड, सप्तशृंगी देवस्थान विश्वस्त भूषण तळेकर, कृषी उपसंचालक मोहन वाघ, अभिनेते डॉ. नीलेश साबळे, रुची कुंभारकर, हेमंत धात्रक, सुनील बागूल, जयंत दिंडे आदी उपस्थित होते.

अण्णासाहेब मोरे पुढे म्हणाले की, देशातील कष्टकऱ्यांचा मूळ व्यवसाय शेती हा आहे. या शेतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना लहानपणापासून जर शेतीविषयी आपुलकी निर्माण झाली तर त्यांचा विकास होईल, त्यांचा विकास झाला तर राज्य आणि देशाचा विकास होऊन देश महासत्ता होण्यास मदत होईल. त्यासाठी हे कृषी संमेलन प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मोरे यांनी केले. (Nashik Krushi Mahotsav)

आ. अनिकेत तटकरे यांनी असे कृषी महोत्सव कोकणातही घ्यावे, असे म्हणत कोकणातील शेतकरी हा तंत्रज्ञानापासून फार मागे आहे. तेथे असे महोत्सव घेतल्यास तेथील शेतकरी प्रगत होईल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली आणि या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल, असे श्री. तटकरे यांनी सांगितले. माजी आमदार डॉ. तांबे यांनी बोलताना, जीवनात ठरावीक काळानंतर एक आध्यात्मिक बैठक आवश्यक आहे. कोणीही समस्याग्रस्त असल्यास माउलीच आधार देतात. हा जागतिक स्तरावरील कृषी महोत्सव कायम होत राहो, जनतेला यामधून अनेक नवनवीन बाबी शिकायला मिळो, असे सांगितले.

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांनी शेती, संस्कार आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम आपल्या मनोगतातून व्यक्त केला. आ. सीमा हिरे यांनी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा हेतू समोर ठेवून हा महोत्सव उभा करण्यात आला असल्याचे सांगितले.

कृषी दिंडी

उद्घाटनापूर्वी शहरातून कृषी दिंडी काढण्यात आली होती. रामकुंड याठिकाणाहून आयोजक आबासाहेब मोरे यांनी पालखीला खांदा देत सुरुवात केली. तेथून मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, गंगापूर रोड मार्गे जागतिक कृषी महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही दिंडी निघाली होती.

नेपाळच्या नागरिकांकडून सन्मान

दरम्यान, उद्घाटन कार्यक्रम सुरू असताना काही नेपाळच्या नागरिकांनी उपस्थिती दर्शवत अण्णासाहेब मोरे यांचा नेपाळच्या देवतेची प्रतिमा देत सन्मान केला. पाच दिवस या प्रदर्शनाला उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगितले.

हेही वाचा :

The post पाच दिवसीय जागतिक कृषी महोत्सवाला सुरुवात appeared first on पुढारी.