नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रकियेस स्थगितीचे महसूलमंत्र्यांकडून आश्वासन

वाळू धोरण लिलाव स्थगिती,www.pudhari.news

देवळा(जि. नाशिक) ; महसूल विभागाच्या नव्या वाळू धोरणानुसार खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी आणि लोहणेर येथील वाळू लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, या प्रक्रियेस स्थगिती मिळावी यासाठी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी बुधवारी (२४ जानेवारी) महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत महसूल मंत्र्यांनी या गावातील वाळू लिलावास स्थगिती देण्याचे आश्वासन दिले.

राज्य सरकारने नागरिकांना स्वस्त दराने वाळू आणि रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित वाळू धोरण जाहीर केले होते. या धोरणानुसार खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी आणि लोहणेर येथील वाळू लिलाव करण्यात आला होता. या धोरणास या गावांमध्ये प्रखर विरोध करण्यात आला होता. गावागावात प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी विशेष ग्रामसभांमधून ग्रामस्थांचे म्हणणे एकूण घेतले. या सर्वच गावांमध्ये या वाळू लिलावाच्या धोरणास विरोध होवूनही प्रशासनाकडून गिरणा नदी पत्रातील या गावांमध्ये नव्या धोरणानुसार वाळू लिलावाची प्रक्रिया राबवण्याचे धोरण सुरूच ठेवल्याने आज ग्रामस्थांनी केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली या धोरणास विरोध करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.

या गावांमध्ये वाळू लिलाव झाल्यास या गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी तसेच लोहणेर गावाच्या नदी पत्रात असणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा होणाऱ्या सटाणा आणि देवळा या मोठ्या शहरांच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी देखील कोरड्या पडून बंद पडतील आणि या शहरांच्या पाणी प्रश्न उग्र बनेल. यामुळे या गावांमधील वाळू लीलाव प्रक्रिया स्थगित करावी अशी विनंती ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत महसूल मंत्र्यांनी लगेचच या वाळू लिलावास स्थगिती देण्याचे आदेश निघतील असे आश्वासन दिले. महसूल मंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिल्याने ग्रामस्थांनी केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या संघर्षाबद्दल आभार मानले.

यावेळी खामखेडचे सरपंच वैभव पवार, उपसरपंच श्रावण बोरसे, गणेश शेवाळे, अनुप शेवाळे, सुनील शेवाळे, सचिन शेवाळे, श्रावण शेवाळे, सावकीचे ग्रामस्थ अनिल शिवले, जिभाऊ निकम, बापू बोरसे, धनंजय बोरसे, किरण निकम, बबलू पवार, भऊरचे ग्रामस्थ संजय पवार, ग्राम सदस्य काशिनाथ पवार, सुभाष पवार, नितीन पवार, गंगाधर पवार, योगेश पवार, लक्ष्मण पवार, विठेवाडीचे विलास निकम, शशिकांत निकम, विठोबा सोनवणे, लोहणेरचे माजी सरपंच सतीष देशमुख, दीपक बच्छाव, सोपान सोनवणे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रकियेस स्थगितीचे महसूलमंत्र्यांकडून आश्वासन appeared first on पुढारी.