पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश

वणी जंगल pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
जंगलातील वन्य प्राणी व पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असल्याने नागरी वसाहतींमधला प्रवेश वाढला आहे. वणी पासून काही अंतरावर जंगलाचा भाग असून यामध्ये अहिवंतवाडी, पायरपाडा, चंडीकापूर, भातोडा या गावालगत जंगल आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असून वन्यपक्षी व प्राणी यांचा पिण्याच्या पाण्याच्या शोधार्ध वणवण वाढली आहे.

बिबट्या वन्य प्राणी व पक्षी जंगलालगत असलेल्या शेतात पाण्याच्या ठिकाणी येत असल्याने शेतपिकांबरोबरच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे छोटी छोटी वन तळे बनवने ही काळाची गरज निर्माण झाली आहे. अहिवंत वाडी डोंगर ते भातोडा असा डोंगराचा भाग आहे. या ठिकाणी शेकडो मोर इतर वन्य जीव आहेत. या परिसरातील नदी, ओढे, नाले, कोरडे झाले आहेत. तर आजुबाजुस काही पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाही.

शेतात लावलेल्या कांद्याच्या पिकांचे नुकसान होत आहे.  मोर व माकडांचा उपद्रवामुळे शेतपिकांची नासाडी होत आहे. बिबट्या सारखे हिंस्र प्राणी देखील या ठिकाणी पाणी प्यायला येतात. विहीरी जवळील साचलेल्या डबक्यात बिबट्या पाणी पितांना लोकांच्या निदर्शनास आले आहे. बिबट्याचा मुक्त वावर असल्याने भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. जंगलाच्या आजुबाजुला आम्ही काही भांड्यात पाणी ठेवतो. याबाबत वन विभागाने त्वरीत दखल घेणे आवश्यक आहे. तसेच सर्व्हे करून मानव-प्राणी संघर्ष निर्माण होऊ नये याकरीता पाण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक झाले आहे. – विठ्ठल भरसट, शेतकरी, पायरपाडा.

येथील जंगलाच्या अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना या उन्हाळ्यापूर्वी दोन तीन महिने  नियोजित करणे अपेक्षित होते. मात्र वनिवभागाने त्याबाबत कोणतेच पाऊले उचलली नाहीत. जंगलात पाण्याचे स्त्रोत निर्माण केल्यास वन्यजीव जंगला बाहेर येणार नाहीत. तसेच पशुधनाचेही नुकसान होणार नाही. गेल्या काही काळात येथील मोरांची संख्या घटत चालली आहे. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी, राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधून दै. पुढारीचे पत्रकार गांगुर्डे यांनी माहिती घेतली. वाघ यांनी तातडीने दखल घेत वनरक्षक कृष्णा एकशिंगे व वन कर्मचाऱ्यांना सुचित करुन या ठिकाणी छोटेसे बशीच्या आकाराचे खड्डा खोदुन पाणी साठवण्या साठी व्यवस्था करण्यात येण्याची माहिती दिली आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असून जंगलात पाण्याचे ओढे, नाले, कोरडे झाले आहेत. जंगलातील प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. यासाठी वरिष्ठ पातळीवर अधिकारी यांच्याशी चर्चा करून उपाययोजना केल्या जात आहेत. छोटे वन तळे किंवा तत्सम काही व्यवस्था प्राध्यान्य क्रमाने केले जाईल. जंगलांतील कोणत्या भागात व्यवस्था होऊ शकतो याचा आढावा घेण्यात येत आहे. पाण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल, तसे वन कर्मचा-याना सुचना देऊन तत्काळ त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. – राहुल वाघ, वन परिक्षेत्र अधिकारी, वन विकास महामंडळ ,दिंडोरी विभाग.

हेही वाचा:

The post पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश appeared first on पुढारी.