पिंपळनेर : सामोडे गावात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी

पिंपळनेर चोरी www.pudhari.news

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील सामोडे येथील जुनागाव भागात सोमवार, दि. 9 मध्यरात्री एकाच रात्री तब्बल ६ ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य केल्याचे चोरीच्या घटनांमधून स्पष्ट झाले आहे. चोरट्यांनी घरात शिरून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले आहे. मात्र चोरीच्या घटनेमध्ये नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

येथील फकिरा राघो घरटे या शेतकऱ्याच्या घरातील दोन दिवसांपूर्वी सोयाबीन विकून आलेले पैसे तसेच कांद्याची लागवड करण्यासाठी घरात ठेवलेल्या धान्याच्या पत्र्याच्या कोठीत बाजरीमध्ये ठेवलेले ५५ हजार रुपये तसेच त्यांच्या पत्नी चंद्रभागा यांच्या पेटीतून ९ हजार पाचशे रु.असा ६४ हजार ५०० रु. रोख रक्कम अज्ञाताने चोरला आहे. त्यांनतर चोरट्यांनी शिंदे गल्लीमधील मधुकर वेडू शिंदे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. येथेही बंद घरातील कडी-कोंडका तोडून प्रवेश करीत घरातील ४ कपाट, १ पेटी फोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले आहे. मात्र या घरातील दाम्पत्य वारीला गेले असल्या कारणाने घरातील किती मुद्देमाल चोरीस गेला हे अद्याप समजू शकलेले नाही. त्यांनतर चोरट्यांनी भर रस्त्यावरील सेवा निवृत्त क्षिक्षक पंढरीनाथ राजाराम घरटे यांच्या घराकडे गेले. येथील दाम्पत्य बाहेरगावी गेल्या असल्याने त्यांच्या बंद घरातील कुलूप व कडीकोंडका तोडून घरात २ कपाटातील लॉकर तोडले आहे. तेथून पुढे चोरट्यांनी महात्मा फुले चौकातील सुनील राजाराम पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून कपाट व कोठ्यांमधील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र तेथेही त्यांच्या हाती काही लागले नसल्याने चोरट्यांनी पिरबाबा गल्लीतील राजेंद्र साहेबराव भदाणे यांच्या मालकीचे शेजारी असणाऱ्या दोन्ही घरात शिरून कुलूप व कडीकोंडका तोडून कपाटी व लॉकर तोडले. तसेच कॉट मधील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र घरमालकही बाहेरगावी गेले असल्याने चोरट्यांनी नेमके काय चोरी केले हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान गावात एकाच रात्रीतून तब्बल ६ घरांची घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये चोरट्यांबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील सर्वच ६ ठिकाणी चोरी झालेली घरे ही बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांनी या घरांमधून नेमके काय काय चोरून नेले हे प्रत्यक्ष घरमालक घरी परतल्यानंतरच उघडकीस येणार आहे. याबाबत काही घरमालक घरी परतल्याने त्यांनी झालेले नुकसान सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी नाना कृष्णा कॉलनी व दत्तनगर येथील एकाच रात्रीतून पाच ठिकाणी घरफोडी करण्यात आली होती. तर गेल्या महिन्यात दोन शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे अवजार रोटावेटर व ऑटो पलटी नांगर असा दोन लाखांचा ऐवज रात्रीतून चोरून नेला होता. ही घटना ताजी असतांनाच रात्रीतून ६ ठिकाणी घरफोड्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माहिती जाणून घेतली असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सहायक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल पाटील पुढील तपास करीत आहेत. सामोडे गावात बऱ्याच दिवसापासून चोरीचे सत्र सुरू असल्याने सामोडे ग्रामपंचायतीने गावात, चौकाचौकात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले असून पोलीस प्रशासनाने चोरट्यांना आळा घालण्यासाठी उपायोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : सामोडे गावात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी appeared first on पुढारी.